नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा बचावलं आहे. टेक ऑफ झालेल्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर ओव्हरवेट झाल्याने पुन्हा एकदा लँडिंग करावं लागलं असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं टेक ऑफ करण्यात आलं होतं. मात्र हेलिकॉप्टर ओव्हरवेट झाल्याचं पायलटच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा लँडिंग करण्यात आलं. प्रवासी जास्त झाल्याने हेलिकॉप्टर उतरवावं लागलं होतं. अखेर खानसामा सतीश यांना उतरवल्यानंतर हेलिकॉप्टरचं टेक ऑफ करण्यात आलं.
पायलटने हिरवा कंदील दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि स्वीय सचिव उपस्थित होते. सर्वजण औरंगाबादला सुखरुप पोहोचले आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर ओव्हरवेट झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. यानंतर त्याने लगेच लँण्डिंग करत एकाला उतरावं लागेल अशी विनंती केली. आम्ही सर्वजण सुरक्षितपणे औरंगाबादला पोहोचलो आहोत'. याआधी रायगड आणि लातूरमध्ये मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावले होते.
मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरणहेलिकॉप्टरमध्ये सहा जणांची क्षमता होती. पण इंधनाच्या समस्येमुले फक्त चार प्रवाशांना परवानगी होती. टेक ऑफवेळी सुरक्षेच्या कारणास्तव फक्त तीन प्रवाशांना नेणं सुरक्षेचं ठरेल असा निष्कर्ष काढण्यात आला, त्यामुळे त्यांनी तशी विनंती केली. यानंतर एका व्यक्तीला उतरवण्यात आलं आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर टेक ऑफ झालं. ही रुटीन प्रॅक्टीस असून, इतका गंभीर मुद्दा नाहीये.
काय घडले रायगडमध्ये ?7 जुलै रोजी मुख्यमंत्री अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उदघाटन सोहळा आटोपून डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले.
लातुरात हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री बचावले!25 मे रोजी लातुरात मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी जमलेल्या प्रचंड गर्दीवर धूळ उडवत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावले आणि काही क्षणात ते जवळच्याच झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले होते. धुळीचे लोट असल्याने नेमके काय घडले ते कोणालाच कळले नाही... पायलट संजय कर्वे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जण बालंबाल बचावले होते. या अपघातात पायलट कर्वे यांच्यासह इतर दोघे नागरिक किरकोळ जखमी झाले होते. निलंगा (जि. लातूर) येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानाजवळ सकाळी ११.४९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला होता.