नाशिक :मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादाने टोक गाठलं आहे. भुजबळ आणि जरांगे पाटील या दोघांकडूनही एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना संयमी भूमिका घेण्यासाठी विनंती करणार असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.
भुजबळ आणि जरांगे पाटलांमधील वादावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की, "राज्यातील वातावरण दूषित होता कामा नये. मी दोघांना देखील सांगितलं आहे की, संयम ठेवा. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील दोघांना विनंती करणार आहेत," अशी माहिती महाजन यांनी दिली. तसंच मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, असंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार उपसमितीची बैठक
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी मांडली असली तरी ते आरक्षण कशा पद्धतीने द्यावं, याबाबत मात्र मतभेद पाहायला मिळत आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचं ओबीसीकरण करावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला काही नेत्यांनी पाठिंबा दिला असला तरी ही मागणी मान्य केल्यास ओबीसींवर अन्याय होईल, असा प्रतिवादही अनेक नेत्यांकडून होत आहे. आरक्षणावरून सुरू असलेल्या या वादात आता गिरीश महाजन यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. आपल्याला सरसकट आरक्षण कुणबी म्हणून देता येणार नाही, अशी भूमिका गिरीश महाजनांनी मांडली.
मराठा आरक्षणाबद्दल बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, "चुकीचं काम होणार नाही, सगळ्या नोंदी जुन्या आहेत. कुणबी नोंदी असलेल्या लोकांना दाखले मिळाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. परंतु आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकणारं द्यायचं आहे. आपल्याला सरसकट आरक्षण कुणबी म्हणून देता येणार नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे," अशा शब्दांत महाजन यांनी सरकारची भूमिका मांडली आहे.
बिऱ्हाड मोर्चावरही दिली प्रतिक्रिया
बिऱ्हाड मोर्चाबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी मोर्चेकरांशी चर्चा झाली असून बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याचं सांगितलं आहे. "बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. त्यांच्याशी मी काल सविस्तर चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे. त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरील प्रश्नांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. या बैठकीनंतर ते मोर्चा मागे घेतील, अशी अपेक्षा आहे,' असं महाजन म्हणाले.