संजय पाठक
नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिकचे मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये दाखल होणार असून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून अंतिम रणनीती आखली जाणार आहे. दरम्यान ते विविध संस्था प्रतिनिधींशी चर्चा देखील करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीतील चार टप्प्यातील मतदान आटोपत असताना आता पाचव्या टप्प्याची तयारी सुरू आहे त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांचे नाशिकमध्ये लक्ष आहे. येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत.
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक मध्ये येणार आहेत सायंकाळी साडेसहा वाजता ते शैक्षणिक संस्था क्रीडा संस्था तसेच अन्य सामाजिक संस्था प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत तर रात्री साडेआठ वाजता नाशिक मधील उद्योजक संघटनांशी ते चर्चा करणार आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील त्यांच्या समवेत असणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री हे महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा देखील करणार आहेत.