नाशिक - गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता आजआपल्या घरातील शुभ-कार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेऊन ठेवते, असे लोकनेते या राज्यात आपण पाहिले आहेत. अनेक लोकनेते ज्यांनी चांगले काम केले. ते लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले. पण गोपिनाथ मुंडे हे लोकनेता या बिरुदाचे मुकुटमणी होते. त्यांनी सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. आता, तर गाड्या घोड्या सर्व आलं पण सत्तरच्या दशकात त्यांनी सायकलवरून या राज्यात पक्ष वाढविण्याचे काम केले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्या
गोपीनाथ मुंडे आणि महाजन यांनी शिवसेना भाजप युतीसाठी पुढाकार घेतला, शिवसेने भाजप युतीचे मुंडेसाहेबच शिल्पकार होते. बाळासाहेबांवरही त्यांचे प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती, आणि बाळासाहेबांनाही त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. विश्वास होता. याचे साक्षिदार आम्ही आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सिन्नर येथील गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण केले. यावेळी, छत्रपती संभाजीनगर येथील गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्यासह रुग्णालयाचीही घोषणा त्यांनी केली.
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची मागणी पंकजा मुंडेंनी केलीय. अनेक शहरांची नावे त्यांनी घेतली. मी याठिकाणी शब्द देतो की, या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहासाठीचे काम युद्धपातळीवर सुरू होईल, असे म्हणद मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले. त्यावेळी, पंकजा मुंडेंनी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत या घोषणेवर आनंद व्यक्त केला. तसेच, पंकजाताई म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक नका उभारू, पण हॉस्पीटल उभारा तर मी आत्ताच सांगतो, मुंडे साहेबांचं स्मारकसुद्ध होईल आणि हॉस्पीटलसुद्धा होईल, अशी घोषणाच मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यावेळी, उपस्थितांनी टाळ्या वाजवून मोठी दाद दिली. आपण, मुंडेंसाहेबांचीच माणसं आहोत, असेही यावेळी, शिंदेंनी म्हटलं. तसेच, ऊसतोड महामंडळ बळकट करु, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.