मुंबई - राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, मृतांच्या नातेवाईकांप्रती सांत्वना व्यक्त केली आहे.
या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच राज्य शासनामार्फत मृताच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. यापुढे राज्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी सर्व संबंधितांनी घ्यावी, असे त्यांनी म्हटले. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेणे आवश्यक आहे असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
शरद पवारांनीही वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात अतिशय दुर्दैवी घटनेत रुग्णांना प्राणांस मुकावे लागले. ही दुर्घटना सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रणेसाठी वेदनादायी आणि आव्हानं वाढवणारी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना. भावपूर्ण श्रद्धांजली.', असे ट्विट पवार यांनी केलंय.
राज ठाकरेंकडूनही शोक व्यक्त
नाशिकच्या दुर्घटनेवर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं अशी मागणी त्यांनी केली आहे.