नाशिक : कार्यकर्त्यांचा चेहरा बघून त्याच्यातील क्षमता ओळखण्याची कला अवगत असल्याने नाशिकमध्ये पक्षाने दिलेले सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण होईलच याची मला अजिबात खात्री वाटत नाही. हिरेंना दिलेली जबाबदारी फरांदेंवर ढकलली जाते तर फरांदेंवर दिलेली जबाबदारी इतरांवर ढकलली जात असल्याने त्याचा फटका पक्षवाढीला बसत आहे. पदाधिकाऱ्यांच्या या मानसिकतेमुळे नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची अवस्था फुल पॅण्ट कापून करण्यात आलेल्या बर्मुडासारखी झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. उपनगर येथील एका लॉन्समध्ये आयोजित केलेल्या भारतीय जनता पक्ष सदस्य नोंदणी अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पक्षातील काही मंडळी ज्येष्ठता व पदांचा आधार घेऊन लाल दिव्याची आस लावून बसले आहेत. जुना-नवा असा वाद निर्माण करून गटबाजी करू पाहणाऱ्या या मंडळींनी लगेचच लाल दिव्याची अपेक्षा करू नये. सध्या पक्षात नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांचा आकडा वाढल्याने जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात खलबते सुरू झाले असून, त्यांची पदांची लालसा वाढली आहे. मात्र अशा कार्यकर्त्यांनी आपल्या इच्छा-आकांक्षांना ब्रेक लावत पक्षवाढीला प्राधान्य द्यायला हवे. अन्यथा आणखी पुढचा काळ त्यांना पक्षाचे झेंडेच उचलण्यात घालवावा लागेल. आतापर्यंत सरकारी स्तरावरून विविध समित्यांच्या पदांचे वाटप केले जात असे. मात्र आता या समित्यांचे पदे पक्ष कार्यालयातून दिले जाणार असल्याने पक्षाला मजबूत करणाऱ्या कार्यकर्त्यांचाच यावेळी विचार होईल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. दानवे म्हणाले की, पक्षीय राजकारण हे सर्कसीप्रमाणे असते. यामध्ये माकडांसह इतरही प्राणी असतात. त्यांच्यात जो सर्वाधिक उड्या मारेल त्यालाच पोटभर खायला मिळत असते. त्यामुळे तुम्हीच ठरवायला हवे की, तुम्हाला पक्षात काय म्हणून वावरायचे आहे. पद हवे असेल तर दिलेली जबाबदारी पार पाडावीच लागेल. स्वत:चे उदाहरण देताना दानवे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा प्रवास सोपा नव्हता त्याकरिता कोणत्या अडथळ्यांवर मात करावी लागली याची कार्यकर्त्यांना जाणीव करून दिली. पुढच्या काळात जर एकहाती सत्ता मिळवायची असेल तर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडावीच लागेल. पक्षाने नाशिकमधून साडेतीन लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य दिलेले असून, ते पूर्ण होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सुभाष भामरे, प्रदेश सरचिटणीस रवि भुसारे, सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, अपूर्व हिरे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विकास देशमुख, सुनील बागुल, सतीश कुलकर्णी, माणिकराव ठाकरे आदि उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला.
मुख्यमंत्र्यांनी केली पुणे-नाशिक रेल्वेची शिफारस
By admin | Published: February 08, 2015 1:31 AM