- सुयोग जोशीनाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याची महत्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी राेजी मुंबई येथे होणार असून त्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस, बांधकाम विभाग यांच्या सुधारित कामाचा आढावा घेण्यात आला. गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तीन दिवसाचा प्रयागराज येथील महाकुंभाचा दाैरा केला. त्यातही कोणत्या विभागाला काय नविन करता येईल, मागील आराखड्यात अजून काय बदल करता येतील याबाबतही सुचना अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आल्या आहेत. त्या दृष्टिने सर्वच विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून सोमवारी दिवसभर त्याबाबतची तयारी सुरू होती.
येत्या दोन वर्षांनी सिंहस्थ होत असून महापालिकेने पंधरा हजार कोटींचा आराखडा तयार केला होता. परंतु विभागीय आयुक्त डाॅ.प्रवीण गेडाम यांच्या सुचनेनंतर मनपा प्रशासनाने हाच आराखडा साडेसात हजार कोटींवर आणला. मागील महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनपासह जिल्ह्यातील यंत्रणेची सिंहस्थ आराखड्याबाबत सविस्तर आढावा घेतला होता. नाशिक कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग करा अशा सूचना दिल्या होत्या. त्यांनतर गेल्या १५ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार होती, परंतु अधिकाऱ्यांच्या प्रयागराज दौऱ्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती, ती बैठक आता महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.