नाशिक - महापालिकेत नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देऊनही वर्षभरात सत्ताधारी भाजपाला विकासाच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत कलह लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे नाशिक महापालिकेची धुरा सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (दि.९) मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच आपला कारभार चालणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, शहर बससेवा ताब्यात घेण्याला प्राधान्यक्रम दिला जाणार असून ई-गर्व्हनन्सवर भर देत आवश्यकतेनुसार नोकरभरती केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंढे यांनी आपली नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनेच झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पांना गती देणे आणि माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची उभारणी करणे आदी बाबींवर आपला भर राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. मुंढे म्हणाले, शहर बससेवा महापालिकेनेच चालवायची आहे. त्याबाबतचा अहवाल क्रिसिलने महापालिकेला दिलेला आहे. फक्त मॉडेल कोणते वापरायचे यावर निर्णय बाकी आहे. शहराला सार्वजनिक वाहतुकीची जास्त आवश्यकता आहे. भविष्यात शहराचे पर्यावरणीयदृष्टया संतुलन बिघडायचे नसेल तर खासगी वाहनांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करावा लागणार आहे. महापालिकेत यापुढे कोणताही प्रकल्प राबविताना त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय, हे तपासले जाईल. कामांच्या निविदा या प्रचलित डीएसआर रेटच्यावर जाणार नाहीत, याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात येईल. गुणवत्तेशी अजिबात तडजोड केली जाणार नाही. शहरात वाहनतळांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी पार्कींग पॉलिसी तयार करण्यात येईल. आॅफ रोड पार्कींगवर जास्त भर दिला जाईल. शहरातील स्वच्छताही महत्वाची आहे. सफाई कामगारांनी वेळेवर नियमित सफाई केली पाहिजे. त्यासाठी आपण स्वत: शहरात फिरणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले. महापालिकेत अपु-या मनुष्यबळाची जाणीव आहे. शासनाकडे महापालिकेने आकृतिबंध पाठविला आहे. तो शासनाकडून मंजूर करून आणून आवश्यकतेनुसार कुशल कर्मचा-यांची भरती केली जाईल. प्रशासकीय कामकाजात आयटीचा वापर अधिक वाढविण्यात येईल. स्मार्ट सिटी अंतर्गत होणा-या प्रकल्पांना गती दिली जाणार असून महापालिका व स्मार्ट सिटी कंपनी यांच्यात उत्तम समन्वय राखला जाईल, अशी ग्वाहीही मुंढे यांनी दिली.वॉक वुईथ कमिशनरनवी मुंबईच्या धर्तीवर तुकाराम मुंढे यांनी नाशिक शहरातही लवकरच ‘वॉक वुईथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. त्याबाबतची रचना लवकरच निश्चित केली जाणार असून नाशिककरांनीही विकासाच्या कामात हातभार लावावा, असे आवाहन मुंढे यांनी केले. घनकचरा विलगीकरणाबाबतही मुंढे यांनी आग्रह धरला आणि ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी उपाययोजना करण्याचे संकेत दिले.
नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 6:46 PM
शहरबससेवेला प्राधान्य : आवश्यकतेनुसार नोकरभरती; ई-गर्व्हनन्सवर भर
ठळक मुद्देमुंढे यांनी आपली नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनेच झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलास्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पांना गती देणे आणि माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची उभारणी करणे आदी बाबींवर भर राहणार