नाशिक : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सोमवारी (दि.२३) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्र ांती मोर्चाने आंदोलन अधिक तीव्र करीत बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक दिली आहे. त्यामुळे वर्षभरानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा घुमणार आहे. दरम्यान, मराठा समाजाने पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाची महापूजा करण्यापासून रोखले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द वापरले असून, फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी तसेच मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा देण्याची मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. औरंगाबाद येथे मराठा समाजाच्या काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी गोदावरीत उडी घेऊन जलसमाधी घेतल्यानंतर मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनासोबतच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती; परंतु नाशिक-त्र्यंबकेश्वरहून हजारोच्या संख्येने आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी परतत असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी नाशिक जिल्हा क्रांती मोर्चाने संयमी भूमिका घेत बुधवारपासून आंदोलन करण्याचा निर्णय नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (दि.२४) येथील वरदलक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी सकाळी सहा वाजेपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्णात कडकडीत बंद पाळला जाणार असून, मराठा क्रांती मोर्चाप्रमाणे या मोर्चातही सर्व समाजबांधवांसह व्यापारी व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखण्यात येणार असून, याच ठिकाणी सरकारला उद्देशून द्यावयाचे निवेदन लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी मराठा समाजाने राज्यभरात ५७ मूक मोर्चे काढून मुंबईत महामोर्चा काढून शासनाला निवेदन दिले. परंतु, सरकारने आतापर्यंतची निवेदने गांभीर्याने घेतली नसून, केवळ निवेदनाची प्रत प्रवेशद्वारावर चिटकविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच गुरुवारपासून आमदार व खासदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असून, यापुढे मराठा क्रांती मोर्चातर्फे ठोक आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, शिवाजी सहाणे, मधुकर कासार, राजेश शेळके, राजू देसले, उमेश शिंदे, पूजा धुमाळ, माधुरी पाटील, मयूरी पिंगळे, अस्मिता देशमाने, आर. डी. धोंगडे, रत्नाकर चुंभळे, सुरेश कमानकर, आशिष हिरे, शिवाजी मोरे उपस्थित होते.राजकीय नेत्यांची बैठकीकडे पाठमराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनात आणि बैठकांना प्रकाशझोतात येण्यासाठी धडपडणाऱ्या राजकीय नेत्यांसह मराठा समाजाचे आमदार व खासदारांसह स्थानिक संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी मंगळवारच्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्हा बंद आंदोलनाच्या नियोजन बैठकीत राजकीय नेत्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या आमदार, खासदारांनीही राजीनामे द्यावेत अन्यथा या आमदार, खासदारांना जिल्हाबंदी करण्यात येईल, असा इशाराही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.नियम पाळण्याचे आवाहनमराठा समाजाच्या आरक्षणाला सर्व समाजांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अन्य समाजांविरोधात कोणीही घोषणाबाजी करू नये. त्याचप्रमाणे आंदोलनाला हिंसक वळण लागेल असे कृत्य कोणीही करू नये, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. त्याचप्रकारे आंदोलनादरम्यान कोणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. त्याचप्रमाणे मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. त्यामुळे कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होईल, असे कृत्य कोणीही करू नये, अशा सूचना मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकीत देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:25 AM