संपूर्ण गावाचा कल धार्मिक असून सगळ्या जाती धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गावात सगळ्याच समाजाची अशी अठरा मंदिरे आहेत. विशेष म्हणजे १८३२ ची स्थापना असलेले हेमाडपंथी, १९१ वर्ष जुने असलेले विठ्ठल महादेव मंदिर गावाच्या अगदी मध्यभागी असून गाव व गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर गावांतील लोकांचेही श्रद्धास्थान झाले आहे. गावात विठ्ठल मंदिरांसह श्रीराम मंदिर, शनी मंदिर, सावता महाराज मंदिर, गणपती मंदिर, सहजादेवी मंदिर, कालिकामाता मंदिर, कानबाई मंदिर, मुक्ताई मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, नागदेवता मंदिर, पीरबाबा ठाणे, महादेव मंदिर, संत गोविंद महाराज मंदिर,श्री स्वामी समर्थ केंद्र,संत सेना महाराज मंदिर आदी धार्मिक स्थळे असून समाजप्रबोधनासाठी रघुवीर समर्थ केंद्र व प.पू.पांडुरंग शास्त्री परिवाराचे स्वाध्याय वर्ग आठवड्यातून दोन दिवस चालतात. गावातील प्रत्येक मंदिरात सकाळ-संध्याकाळ आरती व पूजा ही नित्याचीच. वर्षभरात प्रत्येक जाती-धर्मातील मंदिराचे धार्मिक कार्यक्रम एकत्रितपणे साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील सप्ताहाला तर संपूर्ण गाव हजर असतो.
गावाच्या विकासात कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. सन १९६९ माळमाथ्यावर ज्ञानगंगा आणून परिसरातील शैक्षणिक दुष्काळ दूर केला. त्याच्या ह्या कार्यामुळे गावासह मानके, सायने, देवारपाडे, नाळे, शेंदूरणी, सिताने रोंजाने शेड, गिगाव, म्हालंगाव, दहिकुटे, महाजन वस्ती येथील लोकांना माध्यमिक शिक्षणाची सोय गावातच केली. त्यामुळे आज शैक्षणिक क्षेत्रात ही गाव अग्रेसर असून गावातील शंभरावर तरुण सैन्यदलात देशसेवा बजावत आहेत. माजी कॅबिनेट कामगार कल्याणमंत्री हेमंत देशमुख दोंडाईचा हे मूळ चिखलओहोळ येथीलच आहेत. इंग्रजांच्या काळातील रेस्ट हाऊस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा करण्यासाठी येवला जाताना या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम केला आहे. ऐतिहासिकदृष्ट्याही गावाचा लौकीक आहे.