नाशिक : शहरात गत तीन महिन्यांपासून नाशिकमध्ये डेंग्यूबराेबरच चिकुन गुन्यासारख्या आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील संपूर्ण वर्षभरात चिकुन गुन्याचे केवळ १३ संशयित आणि ८ दूषित रुग्ण आढळले असताना यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंतच तब्बल १९६७ संशयित आणि ६१० दूषित रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाचे प्रमाण हळूहळू कमी होत असताना डेंग्यूप्रमाणेच चिकुन गुन्यासारख्या आजारांनीदेखील आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. गेल्या वर्षी याच काळातील रुग्णांच्या तुलनेत यंदा या दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत कैकपटींनी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता १५ महानगर पालिकांना तातडीची पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये ब्रीडिंग साईट चेकर्सची नियुक्ती करण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना ब्रीडिंग साईट चेकर्स अर्थात डेंग्यूच्या डासांची पैदास होणाऱ्या ठिकाणांचे सातत्याने परीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इ्न्फो
खासगी रुग्णालयांतील रुग्णांची नाही नोंद
कोरोनाचे संकट कायम असतानाच पावसाळ्यामुळे डेंग्यूसह चिकुन गुन्याने उच्छाद मांडला असून, सरकारी रुग्णालयांपाठोपाठ खासगी रुग्णालये सध्या रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयांतील रुग्णांची कागदोपत्री नोंद नसल्याने ही संख्या मोठ्या प्रमाणावर होती. डास निर्मूलनासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधून जंतुनाशक फवारणी व धुराळणी होणे आवश्यक असते. काही आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की शहरी भागात अनेक बांधकामे सुरू आहेत. जिथे एडीस इजिप्टाई डासांचे प्रजनन स्थळ म्हणून पाणी साचणे बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
इन्फो
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक संशयितांची नोंद
यंदाच्या वर्षी चिकुन गुन्या बाधितांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यातही सप्टेंबर महिन्यात संशयितांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. जून महिन्यात २६२ दूषित, जुलै महिन्यात २१८, ऑगस्ट महिन्यात ६२८, तर सप्टेंबर महिन्यात तब्बल ८५२ इतक्या मोठ्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. मात्र, त्यातही समाधानाची बाब म्हणजे एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद नाही.
इन्फो चार्ट
चार महिन्यांतील आकडेवारी
गतवर्षी संशयित दूषित
जून - ० ०
जुलै- ० ०
ऑगस्ट -४ ०
सप्टेंबर - ० ०
यंदा संशयित बाधित
जून - २६२ ८०
जुलै- २१८ १४८
ऑगस्ट -६२८ २०९
सप्टेंबर - ८५२ १६८