पंचवटी : आपल्या आईसोबत गंगाघाटावर आलेल्या आठवर्षीय बालिकेचा गौरी पटांगणाजवळ नदीपात्रात पडून नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, निलगिरी बाग येथे राहणारी पूजा ही शुक्र वारी (दि.८) रोजी दुपारी गंगाघाटावर आई समवेत आली होती. त्यावेळी ती गौरी पटांगणजवळ असलेल्या नदीपात्रात तोल जाऊन पाण्यात पडली. त्यामुळे पूजाच्या नाका-तोंडात पाणी गेले. तिला तत्काळ उपचारार्थ तिच्या भावाने जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (दि.९) दुपारी तिची प्राणज्योत मालवली. नदीपात्रात पूजा अंघोळ करण्यासाठी उतरली असल्याचे समजते. मात्र नदीच्या पाण्याचा अंदाज तिला आला नाही तसेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग सध्या अधिक असल्यामुळे ती पाण्यात बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले.गोदावरी नदीकाठावर येणाऱ्या नागरिकांनी आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवावे, जेणेक रून पाण्यात बुडून मुले मृत्युमुखी पडण्याच्या घटना टाळता येतील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शाळकरी मुलांनी गोदाकाठावर विनाकारण भटकंती करत नदीपात्रात उतरणे टाळावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पाण्यात बुडून बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 1:25 AM