त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील देवगाव येथील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह मंगळवारी (दि.१९) एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागास रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या तीन आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आदिवासी दुर्गम भागात हाेणारे अल्पवयीन मुलींचे विवाह राेखण्याचे मोठे आव्हान विभागासमोर उभे ठाकले आहे.
देवगाव येथील एका इसमाच्या १४ व १५ वर्षे वयाच्या दोन मुलींचा विवाह मंगळवारी (दि.१९) निश्चित करण्यात आला होता. या अल्पवयीन मुलींच्या विवाहाची कुणकुण एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांना समजताच, या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे दोन्ही बालविवाह रोखले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत तीन आठवड्यात तीन बाल मुलींचे तीन विवाह रोखण्यात यश आले आहे. तीन दिवसापूर्वीच तालुक्यातील टाकेदेवगाव ग्रामपंचायत हद्दीतील धाराची वाडी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह थांबविण्यात आला होता. मात्र, नंतर सदर मुलीचा विवाह गुपचूप उरकण्यात आल्याचीही चर्चा होती. परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुपोषणाचे वाढत्या प्रमाणास होणारे बालविवाह कारणीभूत आहेत.
कोट...
वास्तविक कुपोषित बालकाची आई १५ ते १६ वयोगटातील असते. तिला स्वतःची काळजी घेता येत नाही तर तिला बाळ कसे सांभाळतात येणार? त्यामुळे बालविवाहसारख्या प्रथा, अंधश्रद्धा यांच्या आहारी जाऊ नका. कुपोषित बालकांना रुग्णालयात दाखल केल्यास मातांना बुडित मजुरी व आहारही दोघांना मिळतो. शासनाच्या सवलतीचा लाभ घ्या, पण विवाह मात्र सज्ञान झाल्यावरच करावा.
- भारती गेजगे, महिला व बालविकास अधिकारी