नाशिक : लहान बालकांची हिंसा, उपेक्षा आणि शोषण यापासून संरक्षण व्हावे यासाठी ‘ग्राम बाल संरक्षण समितीची’स्थापना करण्यात येणार आहे़ जिल्'ातील प्रत्येक महसुली गावामध्ये येत्या २६ जानेवारी २०१५ रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये या समितीची स्थापना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिले आहेत. गावातील पीडित, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक ती मदत तातडीने पोहोचवणे, बाल संरक्षण, बाल हक्क व बाल सहभाग या विषयांवर गावात जनजागृती करणे ही कामे या समितीने करावयाची आहे़ याबरोबरच शासकीय योजनांची गावस्तरावर माहिती देणे व योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करणे, बाल विवाह, बाल कामगार, अनैतिक व्यापार, बालकांचे लैंगिक शोषण या बाबी गाव स्तरावर घडणार नाही, याकरिता उपाययोजना करणे अपेक्षित आहे़ तसेच बालकांच्या संदर्भातील अत्याचार तसेच शोषणाच्या प्रकरणात योग्य कायदेशीर भूमिका घेणे व संबंधितांना कार्यवाही करण्यास सहकार्य करणे हेदेखील समितीचे प्रमुख काम असणार आहे़ याबरोबरच गावस्तरावर बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून बालकांकरिता सामाजिक सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन या समित्या गठीत केल्या जाणार आहेत़ (प्रतिनिधी)
ग्राम बाल संरक्षण समित्या करणार बालकांचे संरक्षण
By admin | Published: January 20, 2015 12:31 AM