नाशिक : जीवनात ज्ञानाशिवाय चिंतन नाही, प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी आधी त्याची ज्ञानप्राप्ती असावी लागते तसेच परमेश्वर समजून घेण्यासाठी त्याविषयाचे ज्ञान आवश्यकच आहे. आजच्या काळात वाढता हिंसाचार, अत्याचार, भ्रष्टाचार आणि वाईट व्यवहार यांचे प्रमाण वाढले असून, माणूस सद्विचार व सद्धर्मापासून दूर जात आहे. अशा युगात बालपणापासूनच धर्म संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री आचार्यप्रवर महंत साळकरबाबा (धुळे) यांनी केले. पिंपळनारे (चाय चांदवड) येथे बुधवारी (दि. २३) भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवानिमित्त आयोजित धर्मसभेत साळकर बाबा बोलत होते. याप्रसंगी महंत साळकर बाबा म्हणाले की, भक्तिमार्गात साधनांची आवश्यकता असून, परमेश्वर भेट हे साध्य आहे. परंतू गुरुलाच परमेश्वर मानू नका. गुरु हा परमेश्वराचा मार्ग दाखविणारा साधक आहे.व्यासपीठावर महंत मयंकराज बाबा, अचलपूरक बाबा, कृष्णराज बाबा, सुभद्राबाई लोणकर, महंत वाल्हेरान बाबा, बाळकृष्ण सुकेणेकर, सायराज बाबा लोणारकर, गोपीनाराजशास्त्री सुकेणेकर, राजधरदादा सुकेणेकर आदिंसह संतमहंत उपस्थित होते. तरडगाव (जि. सातारा) आश्रमाचे संचालक सुरेशराज राहेरकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, परमेश्वराशी संवाद करावयाचे असेल तर समाजाच्या गोंगाटापासून दूर एकांतात जावे लागते. महानुभाव पंथांचा प्रवास हा एकांताकडून लोकांताकडे म्हणजे समाजाच्या अंतीम घटकाकडे झालेला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा विचार श्रीचक्रधर स्वामी यांनी बाराव्या शतकात मांडला. सर्वसमावेश असेलेले पंथाचे तत्वज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकसंवाद निर्माण व्हायला हवा असेही ते म्हणाले. औरंगाबाद येथील महानुभाव मासिकाचे संपादक संतोषमुनी कपाटेशास्त्री म्हणाले की, जीवनात दृढ संकल्प केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. ऐहिक सुखाच्या मागे धावताना मनुष्य जीवनातील सुखशांती हरवली असून अध्यात्मातूनच आपले जीवन सुसंस्कारी आणि शांतीमय होऊ शकते. आचार्य प्रवर महंत सुकेणेकरबाबा शास्त्री यांनी समारोपप्रसंगी गेल्या पाच दशकापसून सुरू असलेल्या श्रीचक्रधर जयंती महोत्सव सोहळ्याचा आढावा घेऊन पुढील सुवर्णमहोत्सवी जयंती महोत्सव चांदोरी (ता. निफाड) येथे होणार असल्याचे जाहीर केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप पिंपळनारेच्या सरपंच मंदाकिनी कोठुळे, प्रा. सोमनाथ फुगट यांनीही विचार मांडले, धर्मसभेच्या प्रारंभी अखिल भारतीय महानुभाव समितीचे जिल्हाध्यक्ष वामनराव आवारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमास जिल्हापरिषद अध्यक्ष शितल सांगळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश डोखले, डॉ. किरण मोगल, व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक प्रकाश घुगे, महानुभाव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्र्रकाश नन्नावरे, महेंद्रसिंग परदेशी, बाळासाहेब माळी, दत्तात्रय माळी, पिंपळनारेच्या सरपंच मंदाकिनी कोठुळे, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, मुख्याध्यापक राजेंद्र निकम, अॅड. पांडुरंग बोधले, प्रभाकर कातकाडे, सुधाकर भंडारे, बाळासाहेब टर्ले, पोपटराव गायकवाड, अनिल कोठुळे, आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
बालपणापासूनच धर्मसंस्काराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:05 AM