नाशिक : राज्यात एक डिसेंबरपासून सर्व शाळा सुरू होत आहेत; परंतु शासनाने अद्याप शाळा सुरू करण्यासंदर्भात कोणतीही नियमावली स्पष्ट केलेली नाही, अशा परिस्थितीत कोरोनाच्या नवीन म्युटंट ‘ओमिक्रॉन’ची धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी पालकांच्या मनात अजून धाकधूक वाढली आहे.
काेरोनामुळे मागील २० महिन्यांहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या मुलांना आता शाळेत जाता येणार आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्गही ऑफलाइन सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे; परंतु अद्याप ऑफलाइन वर्ग सुरू करण्यासाठी घ्यावयाची प्रतिबंधात्मक खबरदारी तथा नियमावली शिक्षण विभागाने जाहीर केलेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि सर्वच प्रकारच्या शाळा व्यवस्थापनासमोरही संभ्रम निर्माण झाला असून, पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयीही धाकधूक निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण शाळा - ५६२६
शासकीय शाळा - ३४६२
खासगी शाळा -२१६४२
वर्ग - विद्यार्थी
पहिली - ११७०४५
दुसरी -१२१३४२
तिसरी -१२०६१८
चौथी -१२३९३९
पाचवी - १,२३,७४३
सहावी - १,२०,६४५
सातवी -१,१८,३३२
आठवी -१,१५,९१०
नववी - १,११,४२१
दहावी - ९८,९४९३
----
आता मज्जाच मज्जा
ऑनलाइन शिक्षणात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे कंटाळा आला होता. आता शाळा सुरू होणार असल्याने सर्व मित्र शाळेत जाण्यास उत्सुक आहोत. शाळेत गोष्टी गाण्यांच्या तासात खूपच मज्जा येते.
- आकाश जाधव, विद्यार्थी
सिनिअर केजी आणि पहिलीचा वर्ग ऑनलाइनच झाला, आता शाळा सुरू होणार असल्याने सर्व मित्र भेटणार आहे. सर्वजण मिळून शाळेत जाऊन खूप धम्माल मजा करणार आहोत.
-तेजस रोकडे, विद्यार्थी
शाळा सुरू होणार असल्या तरी किती मित्र शाळेत येतील आताच सांगता येत नाही. शाळेत पाठविण्याविषयी आई-वडीलही संभ्रमात आहे; परंतु शाळेत शिक्षकांनी शिकविलेले अधिक समजते. मित्र-मैत्रिणींसोबत अभ्यास करतानाही मज्जा येते.
अश्विनी साबळे, विद्यार्थी
---
आई-बाबांची काळजी वाढली
शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने मुलांची शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने मुले शिक्षणाच्या प्रवाहात सामावली जातील; परंतु शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षण विभागाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे
- अशोक काळे, पालक
मुलांना ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष वर्गातच शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय चांगला असला तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी, शाळेशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी स्कूल बसचालक आदींचे लसीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- सागर कदम, पालक
शाळा सुरू होणार असल्याने मुले शाळेत जाण्यासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र, शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करणार याविषयी अद्याप स्पष्टता नाही, त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही याविषयी मनात भीती आहे.
- शीतल धोंगडे, पालक
सर्वच प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी लागणार
शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप नियमाविषयी शासनाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, शाळा सुरू करताना सर्वच प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी लागणार असून, त्यासाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात कारवाई केली जाणार असल्याची माहीती प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली असून, पुढील एक-दोन दिवसांत शाळा सुरू करण्यासंदर्भात एसओपी जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानुसारच शाळा सुरू होतील; परंतु पालकांनी सकारात्मकता बाळगत मुलांना शाळेत पाठविणे आवश्यक असल्याचे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी व्यक्त केले.