घोटी : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त..असे श्रद्धा ज्याच्या उरी.. त्यासी दिसे हा कानिफा मुरारी.. भाविकांच्या अशा घोषणांनी इगतपुरी परिसर दत्त जन्मोत्सवानिमित्त दुमदुमला. गुरूपादुका पालखी सोहळ्यानिमित्त बाल दिगंबर मिरवणूक काढण्यात आली. २१ हजारापेक्षा जास्त दत्त आणि कानिफनाथ भक्तांनी दत्तजन्माचा जल्लोष केला. इगतपुरी येथील ओम चैतन्य श्री गुरु दत्त कानिफनाथ मंदिराचे ह. भ. प. सावळीराम महाराज शिंगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी शहरात दत्त जन्मोत्सव उत्साहात झाला. या महोत्सवाला राज्यभरातील भाविकांनी दिवसभर हजेरी लावून विविध कार्यक्र मांचा लाभ घेतला. यानिमित्त आठवड्यापासून शेकडो भाविकांच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली. उपस्थित भाविकांसाठी शिंगोळे आणि इतर तज्ज्ञ विचारवंतांनी अध्यात्मिक प्रबोधन केले. इगतपुरी शहरातून राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी गुरु पादुका पालखी सोहळ्यात दत्तगुरूंचा आणि कानिफनाथ महाराजांचा जयघोष केला. दुपारी १२ वाजता २१ हजारांपेक्षा जास्त भाविकांनी दत्तजन्माचा महोत्सव साजरा केला. यानंतर हजारो भाविक भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
इगतपुरीत दत्त जयंतीनिमित्त बाल दिगंबर मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:45 PM