नाशिक : वडाळागाव परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. या कुत्र्यांची मोठी दहशत पसरली असून, एका कुत्र्याने सहा वर्षीय बालिकेवर हल्ला चढवून डाव्या कानाचा लचका तोडल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, सलमा अली शेख (रा. वडाळागाव) ही बालिका अंगणात खेळत असताना भटक्या श्वानाने तिच्या दिशेने झेप घेत तीला जमिनीवर पाडले आणि कानाचा लचका तोडला. हा प्रकार परिसरातील रहिवाशांच्या वेळीच लक्षात आल्यानंतर लाठ्या-काठ्यांनी नागरिकांनी श्वानाला हुसकावून लावले; मात्र या श्वान हल्ल्याने परिसरात दहशत पसरली आहे. जखमी अवस्थेत सलमाला तत्काळ कुटुंबीयांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. मोठ्या प्रमाणात कानाला चावा घेतल्यामुळे कानाचा भाग कापला गेला आहे. तिच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.वडाळागाव परिसरात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून महापालिकेने या भागात सलग काही दिवस मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. यापूर्वीदेखील वडाळ्यातील राजवाडा या भागात दोन लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले होते. त्यानंतर दोन दिवस महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा देखावा दाखविला; मात्र मोकाट कुत्र्यांची संख्या अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन सलग काही दिवस मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
वडाळागावात बालिकेच्या कानाचा कुत्र्याने तोडला लचका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:51 AM