नाशिक : आपल्या पोटच्या सहा महिन्यांच्या मुलीला एका निर्दयी मातेने चक्क सीबीएस बसस्थानकाजवळील एका भिकारी महिलेकडे बेवारसपणे सोडून पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी घडली. याबाबतची माहिती काही जागरूक नागरिकांनी ‘चाइल्डलाइन’ला संपर्क साधून दिली. काही मिनिटांतच चाइल्डलाइनचे पथक सीबीएसला येऊन धडकले. यानंतर काही मिनिटांतच सरकारवाडा पोलिसांचे गस्तीपथकही दाखल झाले. पोलिसांनी त्वरित तपासचक्रे फिरवून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चिमुकलीला साेडून पलायन केलेल्या मातेचा शोध घेतला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सीबीएस बसस्थानकात एक भिकारी महिलेच्याजवळ सहा महिन्याची मुलगी असल्याची माहिती चाइल्डलाइनला मिळाली. चाइल्डलाइनच्या पथकाने सीबीएस येथे जाऊन खात्री पटविली. तसेच संबंधित महिलेकडे विचारपूस केली. मात्र या महिलेने हे बाळ आपले नाही, तिला एक दुसरी महिला माझ्याजवळ टाकून निघून गेली, असे सांगितले. पथकातील कर्मचाऱ्यांनी ती महिला जाऊन किती वेळ झाला, असे विचारले असता त्या भिकारी महिलेने फार जास्त वेळ झाला नाही, असे उत्तर दिले. त्वरित चाइल्डलाइनच्या सदस्यांनी सरकारवाडा पोलिसांना कळविले. पोलिसांचे पथक घटनास्थळी काही मिनिटांत दाखल झाले. या चिमुकलीला सोडून फरार झालेल्या तिच्या मातेचा पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्हीच्या आधारे ओळखून शोध घेण्यास सुरुवात केली.
साध्या वेशातील महिला पोलिसांनी तिला मुलीबाबत विचारले असता तिने काहीही सांगितले नाही. मात्र पोलिसांनी त्यांच्या शैलीत विचारले असता संबंधित महिलेने साहित्य विक्री करण्यासाठी गेली होती. साहित्य जास्त असल्याने तीने मुलीला भिकारी महिलेकडे सोडल्याची कबुली दिली. सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने एका तासात मुलीच्या आईचा शोध घेत माय-लेकीची भेट घडवून आणली. या महिलेला पोलिसांनी कडक शब्दांत ताकीद दिली असून, यापुढे असे केल्यास गंभीर कारवाई होऊ शकते, असे सांगितले.
--इन्फो--
पंचवटीत सापडली महिला
बिनतारी संदेश यंत्रणेवरून पोलिसांनी ‘मॅसेज पास’ करत सीसीटीव्हीत दिसणाऱ्या महिलेचे वर्णन त्यात कळविले. पोलिसांच्या पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर त्या वर्णनाच्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. गोदावरी परिसर पथकाने गाठला असता सीसीटीव्हीत दिसणारी महिला पंचवटी परिसरात पोलिसांना आढळून आली.