सिन्नर, जि. नाशिक (शैलेश कर्पे):सिन्नर शहरातील काळेवाडा परिसरातून आडत व्यापारी सुरेश कलंत्री यांचे नातू व तुषार कलंत्री यांचा मुलगा चिराग (१२) याच्या अपहरण प्रकरणाचा रात्री एक वाजेच्या सुमाराचा सुखरूप शेवट झाला. अपहरणकर्त्यांनी रात्री एक वाजेच्या सुमारास बारा वर्षाची चिराग याला दुचाकीवर शहरातील सिन्नर मेडिकल जवळ आणून सोडले. चिरागची सुखरूप सुटका झाल्यानंतर सिन्नरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान पोलिसांनी दोन संशयित अपहरणकर्त्याना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात अपहरणकर्त्यांनी सायंकाळी साडेसात वाजेच्या येथील काळेवाडा परिसरात ४ ते ५ बालके खेळत असताना सफेद रंगाची एक बिगर नंबर प्लेटच्या ओम्नी कार मधून चिराग याचे अपहरण करण्यात आले होते.
घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरतयानंतर रात्री सिन्नर पोलीस ठाण्यात व्यापारी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा कलंत्री कुटुंबीय सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार येऊन चिराग चे अपहरण केल्याची तक्रार दिली होती. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास पथके निर्माण करून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली होती. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली जात होती.
दरम्यान, सिन्नर शहरातील सोशल मीडियावर बालकाचे अपहरण झाल्याची वार्ता, फोटो व ओमनी कारचे वर्णन पाठविण्यात येत होते व कोणाला माहिती मिळाल्यास पोलीस व कुटुंबियांना माहिती देण्याचे आवाहन केले जात होते. अपहरणकर्त्यांची ओमनी कार सीसीटीव्ही च्या फुटेज मध्ये कैद झाली होती. त्याआधारे पोलीस पथके रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी व तपास करीत होते. रात्री एक वाजेच्या सुमारास अचानक अपहरणकर्त्यांनी चिराग याला दुचाकी वर सिन्नर मेडिकल जवळ आणून सोडल्याचे पोलिसांनी सांगितले. चिराग याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
अपहरणकर्त्यांनी कुटुंबीयांना फोनही केला होता त्याआधारे पोलिसांनी दोन संशयित अपहरणकर्त्याना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांनी 'लोकमत'ला दिली. अपहरणकर्त्यांनी चिराग याचे अपहरण कोणत्या कारणासाठी केले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस अपहरणकर्त्यांचे साथीदार व अपहरण करण्यामागचा कारणाचा शोध घेत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"