नीलेश कदम
सप्तशृंगगड (जि. नाशिक) - प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे व नारी शक्ती’ या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात व रथावर फुलांचा वर्षाव करत रस्त्यावर रांगोळी काढून ग्रामस्थ व ट्रस्टतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळी ११ वाजता शिवालय तलाव येथून या चित्ररथाची ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
कळवणचे तहसीलदार बंडू कापसे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सप्तशृंगी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, सरपंच रमेश पवार, चित्ररथाचे संयोजक जयेश खोट यांच्या हस्ते चित्ररथाची पूजा करून नारळ फोडून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. शिवालय तलाव, ममादेवी मंदिर, नागेश्वरी चौक, ग्रामपंचायत कार्यालय रस्त्यावरून हा चित्ररथ पहिली पायरी येथे आणण्यात आला. याठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. रथाला साडी-चोळी अर्पण केल्यानंतर महिलांनी प्रत्येक गल्लीत घरासमोर आरती केली. या चित्ररथाच्या पुढे उभे राहून भाविकांनी व ग्रामस्थांनी सेल्फीचा आनंदही घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन सप्तशृंगी देवी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, पोलिस प्रशासन, महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी व ग्रामस्थांनी केले होते.