नाशिक : येथील कृष्णानगर बस थांब्याजवळ दाबेली, पाणीपुरीसारखे चाट खाद्यपदार्थ विक्री हातगाडीवर करणाऱ्या विक्रेत्यास दोघा गुंड प्रवृत्तीच्या तरूणांनी येऊन दमदाटी करत धमकावून मारहाण केली. यावेळी रविवारी (दि.२६) संध्याकाळी तेथून जात असलेले बाजीराव दातीर (४६, रा.दातीर मळा) हे थांबून बघत असताना हल्लेखोरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवून चॉपरने हल्ला चढवून जखमी केले. यामुळे परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, दातीर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित करण अण्णा कडुस्कर, मनोज भोजने या दोघा संशयितांविरूध्द प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.महालक्ष्मीनगर, कृष्णानगर या भागात गुन्हेगारी फोफावत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापुर्वीही येथे काही समाजकंटकांनी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने वाहनांची जाळपोळ केली होती. अंबड पोलिसांकडून या भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळल्या जात नसल्याने कायदासुव्यवस्था धोक्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नानंतर परिसरातील केवल पार्क, महालक्ष्मीनगर, कृष्णानगर आदि भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन ठिय्या देत तत्काळ संशयित गुंडांना अटक करावी, या मागणीसाठी आंदोलन केले. यामुळे परिसरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले; मात्र जोपर्यंत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी येणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा रहिवाशांनी घेतल्यामुळे अखेर काही वेळेत नांगरे पाटील हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढत या भागातील वाढलेली गुन्हेगारी समुळ नष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक ांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनता सिडकोचे प्रभाग सभापती दीपक दातीर, नगरसेवक राकेश दोंदे, साहेबराव दातीर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.---
अंबडमध्ये नागरिकावर चॉपरने केला प्राणघातक हल्ला; रहिवाशांचा रस्त्यावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 2:21 PM
दातीर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित करण अण्णा कडुस्कर, मनोज भोजने या दोघा संशयितांविरूध्द प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देसंशयित गुंडांना अटक करावी, या मागणीसाठी आंदोलन नांगरे पाटील हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले