सिडको : चुंचाळे, अंबड भागात महापालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्पादन योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील बेघरांसाठी चुंचाळे बेघर घरकुल योजना उभारण्यात आली असून, या भागात शासकीय जागेवर अवैध स्टोन, खडी क्रशर व्यावसायिकांमुळे माती, खडी व कच यांची धूळ उडत आहे. यामुळे या भागात प्रदूषण वाढले असून, रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात प्रभाग क्रमांक २७ मधील नगरसेवक व रहिवाशांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अंबड-चुंचाळे भागांतील बेघर घरकुल योजनेतील रहिवासी, व्यावसायिक, उद्योजक व नागरिक या ठिकाणी अनेक वर्षांपासून राहत आहेत. तसेच येथे बांधकाम कारागीर, बिगारी व मजुरी करून मिळेल ते काम करीत आहेत. परंतु गेल्या एक वर्षापासून येथील शासकीयमालकीच्या भूखंडावर काही व्यावसायिकांनी बेकायदेशीररीत्या स्टोन, क्रशरचा अवैध व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणाची हानी होऊन प्रदूषण वाढत आहे त्यातच बारीक गिट्टी, कच, सीमेंट मिश्रित माती उडून मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर खडी व दगड घेऊन जाणारे शेकडो ट्रक येथून रो जा-ये करतात. या अवजड वाहनांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहे. स्टोन क्रशरच्या आवाजामुळे शांततेचा भंग होऊन ध्वनीप्रदूषणदेखील वाढले आहे. या भागातून रोज वाहतूक करणाºया मालट्रकमधील लहान-मोठी खडी, कच रस्त्यावर सांडून अपघात होतात. घरात व दुकानात धुळीचे थर साचतात. याबाबत तक्रार केल्यास सदर धनदांडगे व्यावसायिक रहिवाशांना धमक्या देतात. त्यामुळे सदर स्टोन व खडी क्रशर व्यवसाय बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक राकेश दोंदे, शशीकला अवचार, बेबीताई शेजवळ, शालू जमदाडे, रंजना माळे, साबेरा सय्यद, ज्योती सोनवणे, कमळ सांळुके, पूनम सोनवणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
चुंचाळे, अंबड भागात अवैध स्टोन क्रशर व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:40 AM