मनमाड : शहरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात सुरू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध चर्चमध्ये आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. मध्यरात्री संत बार्णबा चर्च, बेथेल चर्च, सेव्हथ-डे अॅडव्होटिस्ट चर्च आदी विविध चर्चमध्ये नाताळनिमित्त प्रार्थना व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांच्या आतषबाजीने शहर दणाणून गेले. परिसरात ख्रिश्चन बांधव आबालवृद्ध महिला मोठ्या संख्येने नवे कपडे परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते.नाताळनिमित्त ठिकठिकाणी आकर्षक, रोषणाई भव्य स्टार, नाताळ शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चमध्ये नाताळ संदेश भक्ती उपासना, बार्णबा चर्चमध्ये संत बार्णबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कॅम्प येथे दरवर्षीप्रमाणे भव्य स्टार उभारण्यात आला आहे. नाताळ व नवर्षीनिमित्त पुर्व संध्या बप्तीसे, निराधार विधवांना साडीवाटप, संदेश भक्ती, पवित्र सहभागीता, वृक्षारोपण कॅण्डल सर्व्हिस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी रेव्ह. आर.पी. घुले, अशोक पाटोळे, शमुवेल कुबेरजी, अतुल सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र सहभागिता करण्यात आली. डी. डी. शेलार, दिलीप सूर्यवंशी, डेव्हीड नगालीकर, अविनाश सूर्यवंशी, विजयानंद अस्वले, मोनिका कुबेरजी, माणीक जाधव, सतीश सूर्यवंशी, स्मिता खडांगळे यांच्यासह चर्च कमिटी सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
नाताळ सणास उत्साहास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:48 PM