लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक - ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले असून, शुक्रवारी (दि.२५) ख्रिसमसचा जल्लोष होणार आहे. ख्रिसमसनिमित्त शहरातील सर्व ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्व चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असले तरी आले असले तरी कोरोनामुळे निर्बंध लागू असल्याने समाजबांधव एकत्र येण्याऐवजी आपापल्या घरी राहूनच सांताक्लॉज स्वागत करणार आहे.
ख्रिसमसनिमित्त शहरातील सर्व चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, चर्चसह ख्रिस्ती बांधवांच्या घरात प्रभू येशू यांच्या जन्माचा देखावा साकारण्यात आला आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रात्री ९ वाजता शहरातील सर्व चर्चमध्ये आणि ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी कॅरल सिंगिंग करत एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्रभू येशू जन्माचा सोहळा द्विभाषिक मिस्सा रात्री ९.३० वाजता करण्यात आला असून, शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. परंतु , कोरोनामुळे या कार्यक्रमांना ख्रिस्ती बांधवांना उपस्थित राहता येणार नाही. कोरोनाचे सावट जरी असले तरी ख्रिस्ती बांधवांच्या घराघरांत सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध चर्चला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सणासाठी बाजारपेठही फुललेली पाहावयास मिळत आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये समाजबांधवांकडून तोंडावर मास्क लावून विविध वस्तूंच्या खरेदीवर भर दिला जात आहे. लहानग्यांसाठी आकर्षक भेटवस्तू खरेदी केल्या जात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
इन्फो-
जिंगल बेल,ख्रिसमस ट्रीची खरेदी
बाजारात सांताक्लॉजची टोपी, चिमुकल्यांच्या सांताक्लॉजच्या पोशाखासाठी लागणारा विशिष्ट पद्धतीने बनविलेला ड्रेस ख्रिस्ती बांधवांनी खरेदी केले असून आकर्षक जिंगल बेल, चांदण्या, ‘ख्रिसमस ट्रीॅ चीही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर अनेकांनी घरीच ख्रिसमस ट्री तयार करून नाताळ सणाची तयारी केली आहे.