लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाची उभारणी करणाऱ्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राधेश्याम मोपलवार यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना चकवा दिला. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून आलेल्या मोपलवार यांनी जिल्ह्णात ‘समृद्धी’विरुद्ध तापलेले वातावरण पाहता कोणासही भेट न देता मुंबईकडे प्रयाण केले. दरम्यान, मोपलवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास जिल्ह्णातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून, त्या संदर्भात शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याबरोबरच प्रसिद्धी माध्यमांसमोर समृद्धी महामार्गाचे सादरीकरण, त्याचे फायदे आदि माहिती देण्यासाठी मोपलवार यांच्या पत्रकार परिषदेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. समृद्धी महामार्गाच्या प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या ‘परफेक्ट रिलेशन’ नामक संस्थेने तशी आमंत्रणेही पाठविली होती. मात्र मोपलवार यांच्या या कार्यक्रमात शेतकरी जाब विचारतील, अशी भीती वाटल्यामुळेच की काय मोपलवार यांचा पत्रकारांशी संवाद रद्द करण्यात आला. मोपलवार यांच्याकडे मालेगाव महापालिका निवडणुकीचे निरीक्षक म्हणून जबाबदारी असून, त्यांनी मालेगावी भेट दिली व जाताना नाशिक येथे काही काळ त्यांनी विश्रांतीही घेतल्याचे सांगण्यात आले, मात्र या काळात त्यांनी कोणास भेट दिली नाही. मोपलवार जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याचे समजल्याने पदाधिकाऱ्यांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदविला तसेच निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर करून त्यात ज्या ज्यांनी महामार्गाला विरोध दर्शविला त्यांची आकडेवारी जाहीर करा व ज्या शेतकऱ्यांनी महामार्ग व्हावा, अशी मागणी केली त्यांचीही नावे जाहीर करा, अशी मागणी केली आहे. यावेळी राजू देसले, कचरू पाटील डुकरे, भास्कर गुंजाळ, दौलतराव दुभाषिक, दिनकर गुंजाळ, वैभव गुंजाळ, रमेश रहाणे, राम किसन भोसले, नारायण मालपाणी आदि उपस्थित होते.
शेतकऱ्यांना चकवा
By admin | Published: May 12, 2017 1:28 AM