नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे यांना बाजार समितीतच कंत्राटी कामगाराला नियुक्तिपत्र देण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१६) रंगेहात पकडले. त्यानंतर बाजार समितीच्या मुख्य कार्यालयातून अटक केली आहे. या प्रकारामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चुंभळे यांना अटक होताच त्यांच्या समर्थकांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयावर गर्दी केली होती. तर त्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती.आजवर अनेक शासकिय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लाखो रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करून अटक झाली आहेत परंतु राजकीय नेता किंवा लोकनियुक्त प्रतिनिधीला इतक्या मोठ्या प्रमाणावर लाच घेताना अटका करतानाचा हा जिल्ह्यात पहिलाच प्रकार असल्याचा पहिलाच प्रसंग असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.बाजार समितीतील एका कंत्राटी कामगाराच्या सासऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तक्रारदारांचा जावई यांना ई- नाम योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कामगार म्हणून नेमण्यात आले होते.त्याच्या नियुक्तीचा कालावधी संपल्याने पुढील नियुक्तिपत्र देऊन कामावर रुजू करण्यासाठी शिवाजी चुंभळे यांनी दहा लाख रुपयांची मागणी केल्याने संबंधित कामगाराच्या सासºयांनी १३ आॅगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नाशिक कार्यालयात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असताना शिवाजी चुंभळे यांनी तडजोडी अंति तक्रारदारांकडे सहा लाख रुपये लाचेची मागणी करून तीन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केल्याचे लक्षात आले होते. त्याच आधारावर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (दि.१६) सापळा रचून शिवाजी चुंभळे यांना दुपारी १ वाजेच्या सुमारास तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांना कॅनडा कॉर्नर येथील लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक कार्यालयात आणून त्यांची चौकशी करण्यात आली. याठिकाणी सुमारे चार तास कसून चौकशी केल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा एसीबीने चौकशीला सुरुवात केली असून, रात्री उशिरापर्यंत चुंभळे यांची चौकशी सुरू होती. या कालावधीत चुंभळे यांच्या समर्थकांनी एसीबी कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिवाजी चुंभळे यांना अटक केल्यानंतर एसीबीच्या कार्यालय परिसरात त्यांच्या कार्यकर्त्यांसह राजकीय मंडळींसह कायदेतज्ज्ञांनीही याठिकाणी उपस्थिती लावली होती. बाजार समिती अनेक वर्षांपासून वादाच्या आणि गैरव्यवहाराने गाजत आहे. त्यासंदर्भात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. या बाजार समितीवर देवीदास पिंगळे यांचे निर्विवाद वर्चस्व होते. दोन ा वर्षांपूर्वी शिवाजी चुंभळे यांनीच त्यांना पराभूत करून सत्ता काबिज केली होती. २५ जूलै २०१७ रोजी चुंभळे यांनी सभापतीपदाचा कार्यभार स्विकारला होता. तथापि, त्यावरून पिंगळे आणि चुंभळे यांच्यात जोरदार संघर्षही सुरू झाला आहे.
नाशिकच्या राजकारणातील मोठे प्रस्थनाशिक तालुक्यातील विल्होळी, गौळाणे पंचक्रोषीतील मोठे प्रस्त आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारावाईमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. गौळाणे येथून नाशिकमध्ये आलेल्या शिवाजी चुंभळे यांनी १९८५-८६ च्या दरम्यान सिडको भागात चहाच्या स्टॉलपासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पुढे त्यांनी १९८८ ते ९०च्या दरम्यान सैन्यदलाच्या प्रात्यक्षिकातील दारूगोळ्यांचे भंगार जमा करण्याचा ठेका मिळवित व्यवसाय वाढविला.इमारत बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसायदेखील त्यांनी वाढविला तसेच त्यांनी राजकारणातदेखील जम बसविला.राजकीय कारकिर्दीला धक्का२००७ मध्ये मनपा नगरसेवक म्हणून चुंभळे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून लढतांना प्रतिस्पर्धी उमेदवार विष्णू पवार यांना जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मात देत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. कल्पना चुंभळेंनाही नगरसेवक बनवून महापालिकेत स्थायी समिती सभापतिपद मिळविले. याच जोरावर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली. परंतु, पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून कडवी झुंज दिली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत पुन्हा कल्पना चुंभळे यांना महापालिकेत नगरसेवक केले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी उमेदवारीची तयारी केली होती. परंतु पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी प्रतीक्षेची भूमिका घेऊन विधानसभेची तयारी सुरू केली होती.