नाशिक : महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या अट्टहासातून स्थापन करण्यात आलेल्या विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या तीनही समित्या केवळ शोभेपुरत्याच उरल्या असल्या तरी, सभापतिपदाचा मान आणि त्यासाठी मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी इच्छु कांमध्ये चुरस वाढली आहे. येत्या २६ एप्रिलला या तीनही विषय समित्यांसह महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठीहीनिवडणूक घेण्यात येणार असून, सत्ताधारी भाजपातील सुंदोपसुंदी पाहता आहे ते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे.महापालिकेत सर्वाधिक ६६ नगरसेवक निवडून आणत भाजपाने सत्ता संपादन केली, मात्र सत्तेच्या या खेळात सर्वांना सत्तापदांचा लाभ देण्यासाठी विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या तीन विषय समित्यांची रचना नव्याने करण्यात आली. मात्र, या समित्या स्थापन करताना त्यांना फारसे आर्थिक अधिकार बहाल न केल्याने तीनही समित्यांची कामगिरी गेल्या वर्षभरात निराशाजनक राहिली. समित्यांच्या सभांनादेखील अधिकारीवर्गाकडून दुय्यम स्थान दिले गेले. शिवाय, प्रशासनाकडून एकही प्रस्ताव समितीवर आणला गेला नाही. समित्यांच्या सभा केवळ चर्चेसाठीच उरल्या. त्यातल्या त्यात, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनावर अंकुश ठेवत काही प्रमाणात धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातून परिणामकारक असे काहीही घडले नाही. त्यामुळे तीनही समित्या केवळ शोभेच्या ठरल्या. आता प्रभाग समिती सभापतिपदाबरोबरच विषय समित्यांच्याही सभापतिपदासाठी येत्या २६ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार असून, त्यासाठी २४ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. शहर सुधारणा समितीसाठी वर्षा अनिल भालेराव आणि पूनम सोनवणे यांचे नाव चर्चेत आहे, तर विधी समितीसाठी संगीता गायकवाड, दीपाली कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर आहे. वैद्यकीय व आरोग्य समितीच्या सभापतिपदी पुन्हा एकदा ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांचीच निवड होण्याची दाट शक्यता आहे.याशिवाय, रुची कुंभारकर, प्रतिभा पवार हे सुद्धा शर्यतीत आहेत. विषय समित्या या केवळ शोभेपुरता असल्या तरी त्या माध्यमातून नागरिकांमध्ये मिळणारा मान आणि वाहन, दालन या सुविधा पाहता सभापतिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.महिला समितीतही रस्सीखेचमहिला व बालकल्याण समितीतही मागील वर्षाचा काळ संघर्षातच गेला. सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनाही कामकाज चालत नसल्याने आंदोलनात सहभागी होण्याची नामुष्की सहन करावी लागली होती, तर सामूहिक राजीनाम्याचीही तयारी केली गेली होती. आता तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिला व बालकल्याणसाठी राखीव निधी हा केवळ शासकीय परिपत्रकात समाविष्ट उपक्रमांवरच खर्च करण्याची तयारी दाखविल्याने समितीला स्वत:च्या संकल्पना राबविता येणार नाही. असे असतानाही महिला व बालकल्याण समितीत सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. प्रामुख्याने, हेमलता कांडेकर आणि सीमा ताजणे यांच्या नावाची चर्चा आहे. अन्य भाजपाच्या सदस्य शीतल माळोदे यांनी विधी समितीचे सभापतिपद, तर कावेरी घुगे यांनी महिला व बालकल्याणचे उपसभापतिपद भूषविले आहे. अर्चना थोरात या गिते समर्थक मानल्या जातात.
विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:15 AM