सिडको : दाट लोकसंख्या व कामगार वस्ती म्हणून ओळखल्या जात असलेल्या सिडकोत तब्बल एक लाखाहून अधिक नागरिकांचे आजवर दोन्ही डोसचे लसीकरण करण्यात आले असून, त्यासाठी ३१ केंद्रे ठिकठिकाणी कार्यरत आहेत. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
सुमारे चार लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सिडकोत शुक्रवार (दि. ३) पर्यंत सुमारे १,०५,७३ इतक्या नागरिकांचे दोन्ही लसींचे डोस पूर्ण झाले. कोरोनापासून संरक्षण व बचाव होण्यासाठी शासनाच्या वतीने महापालिकेमार्फत सिडकोत मोफत लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत असून, मार्च २०२१ पासून सिडको भागात एकूण ३१ केंद्रांनी मिळून सुमारे एक लाख, पाच हजार ७३ इतक्या नागरिकांचे लसीकरण केले आहे. महापालिका व नगरसेवकांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू असून, गेले काही दिवस लसीचा साठा नियमित उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना पहाटेपासून रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागत होते. तसेच यामुळे अनेकदा वाद होण्याचे प्रकारही घडले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिडको भागातील विविध केंद्रांवर नियमित लसीकरण उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बहुतांची लसीकरण केंद्र हे नगरसेवकांच्या तसेच काही सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याने आपल्या केंद्रावर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी नगरसेवकदेखील काळजी घेत असल्यामुळे लसीकरणाची संख्या वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकट====
बोगस लसीकरणही गाजले
गेल्या आठवड्यात हेडगेवार चौकातील लसीकरण केंद्रावर २० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचा दावा भाजपच्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी केला होता. २० हजारावा डोस पूर्ण झाल्याच्या सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही सहभागी करून घेतले गेले. प्रत्यक्षात मात्र प्रभागच्या सभेत शिवसेनेने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने हा दावा खोडून काढल्याने भाजपचे हसे झाले होते. या केंद्रावर केवळ अकरा हजार लसीकरण झाल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
=====
कोट==
सिडको भागात महापालिकेच्या अचानक चौक, श्री स्वामी समर्थ रुग्णालय मोरवाडी, पवनानगर कामटवाडे, अंबड, पिंपळगाव खांब आदी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून शुक्रवार(दि. ३) पर्यंत एक लाख पाच हजार ७३ टक्के लसीकरण झाले आहे. यापुढील काळात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.
- नवीन बाजी, वैद्यकीय अधिकारी, सिडको