नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (दि.१४) सिडको विभागात धडक मोहीम राबवत १० प्रकरणांमधील तब्बल ३७ अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्क्या बांधकामांचा समावेश होता. महापालिकेच्या पथकाने पाथर्डी फाटा, प्रशांतनगर येथील चंद्रभागा सोसायटीमधील पी.जी. सुरेश कुमार यांचे पत्र्याचे शेड व लोखंडी जाळ्या, धनशेखर यांचे पत्र्याचे शेड व लोखंडी जाळ्या, गिरीश जोशी, महेश येवले, नवनाथ मोंढे, भावेश जाधव व गिरीश जोशी, साहेबराव साळुंखे आणि गणेश मोरे यांचे गाळ्यासमोरील शेड हटविण्यात आले. तसेच रविराज वाटिका बिल्डिंग, कामटवाडे येथील धामणे क्लासेस, तोरणानगर येथील त्रिनेत्र अपार्टमेंट येथील रसिद शेख तसेच शरद मोहन यांचे समोरील सामासिक अंतरातील शेड काढण्यात आले. बापू महादू शिलावट, शिवाजी पवार, बंडू बागुल यांचे समोरील सामासिक अंतरातील शेड काढण्यात आले. याशिवाय साईबाबानगर, एन. ४१ येथील प्रदीप पाटील तसेच लोकमान्यनगर, एन. ४२, त्रिमूर्ती चौक येथील २ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. हॉटेल ताज समोरील स्वस्तिक चेंबर येथील प्रशांत संघवी यांचे रस्त्यावरील २ प्रवेशद्वार, दुर्गानगर फ्रेशअप बेकरीमागे, अवनी अपार्टमेंट येथील ७ अनधिकृत बांधकामे, सिडको त्रिमूर्ती चौक येथील एन. ४५ मधील २ बांधकामे, पवननगर येथील शिंदे मेस समोरील पतंजली स्टोअर्स व राजश्री लॉटरी सेंटर येथील किरणसिंह पाटील यांचे अनधिकृत बांधकाम, आनंदनगर, पाथर्डी फाटा, श्यामदर्शन अपार्टमेंटमधील १ अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. गुरु कृपा सुपर मार्केट, राजहंस अपार्टमेंट, प्रशांतनगर येथील ५ अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. एकूण १० प्रकरणांमध्ये ३७ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.पोलीस बंदोबस्तात कारवाईमहापालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबविली. यावेळी अतिक्रमण विभागाची दोन पथके तैनात ठेवण्यात आली होती. सदर मोहीम विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, नगररचनाचे अभियंता सुभाष भामरे, सुशील शिंदे, मिरगणे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. सदर बांधकाम हटविताना काही ठिकाणी रहिवाशांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु, पथकापुढे त्यांच्या विरोधाची मात्रा चालली नाही.
सिडकोतील ३७ अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:36 AM