नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गटस्तरीय महिला नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण वसाहत सिडकोच्या कलाकारांना प्रथम पारितोषिक मिळाले.या स्पर्धांचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी सिडकोतील ललित कला भवन येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून योगीता पवार व सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव उपस्थित होत्या. या नाट्य स्पर्धेत सातपूर, सिडको, जुने नाशिक, देवळालीगाव, एकलहरे, सिन्नर, पिंपळगाव, नेहरूनगर, नाशिकरोड येथील सुमारे १२ महिला संघांनी भाग घेतला. परीक्षक म्हणून स्वाती शेळके, शुभांगी पाठक, राजेश शर्मा यांनी काम पाहिले. या स्पर्धेत कामगार कल्याण वसाहत सिडकोच्या संघास प्रथम पारितोषिक मिळाले. देवळालीगाव केंद्रास द्वितीय, ललित कला भवन सिडकोला तृतीय, तर उत्तेजनार्थ प्रथम कामगार कल्याण केंद्र एकलहरे व द्वितीय क्रमांक कामगार कल्याण भवन सातपूर या संघांना मिळाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण निरीक्षक व महेश विभांडीक यांनी केले. कल्याण निरीक्षक भानुदास जाधव यांनी आभार मानले.