सिडको : खिळखिळ्या झालेल्या खेळण्या, वाढलेले गाजरगवत, ठिकठिकाणी साचलेला पालापाचोळा अशी परिस्थिती सध्या सिडको विभागातील उद्यानांची झाली असून, देखभालीअभावी उद्यानांची जागा ही मद्यपींनी घेतली असल्याने याबाबत सिडकोवासीयांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उद्यान विभागात गेल्या अनेक वर्षांपासून उद्यान विभागाशी निगडित असलेल्या तज्ज्ञांची नेमणूक न करता शाखा अभियंता, चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशांकडे सिडकोचा पदभार देण्यात आल्याने सिडको भागातील उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे. सध्या सिडकोला प्रभारी उद्यान निरीक्षक म्हणून पी. बी. चौकटे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिडको विभागासाठी नवीन उद्यान निरीक्षक म्हणून अमर निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु निकम हे नवीनच असल्याने त्यांनादेखील अजून सिडकोच्या उद्यानांचा अभ्यास करावा लागत आहे. सिडकोतील सहा प्रभागांमध्ये महापालिकेचे एकूण ७२ उद्याने आहेत. यापैकी ४८ उद्याने देखभालीसाठी देण्यात आली असून, २४ उद्याने मनपाच्या ताब्यात आहेत. परंतु ठेकेदाराकडे देखभालीसाठी देण्यात आलेली उद्याने तसेच महापालिकेकडे असलेली उद्याने या दोघांचीही अवस्था दयनीय झाली आहे. सिडको भागातील बोटावर मोजण्याइतकी उद्याने जर सोडली तर बहुतांशी उद्यानांमध्ये खिळखिळ्या झालेल्या खेळण्या, वाढलेले गाजरगवत, ठिकठिकाणी साचलेला पालापाचोळा, उद्यानांमधील बंद दिवे अशी परिस्थिती झाली आहे. नगरसेवक कल्पना पांडे यांनी प्रभाग २४ मधील उद्यानांची दयनीय अवस्था झाली असल्याबाबत प्रभाग सभेत लक्षवेधी मांडली होती. शुक्रवारी (दि.१८) उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले यांनी पांडे यांच्या प्रभागातील उद्यानांची पाहणी केली. यावेळी आमले यांनी टप्प्याटप्प्याने उद्यानांची दुरुस्ती करण्यात येणार असून, उद्यानांमध्ये ग्रीन जीम, बँचेस बसविण्याबरोबरच उद्यानातील नादुरुस्त खेळ्ण्यादेखील त्वरित दुरुस्त करणार असल्याने सांगितले.सिडको भागात महापालिकेची एकूण ७२ उद्याने असून बहुतांशी उद्यानांमध्ये रात्रीच्या वेळी देखरेख करण्यासाठी कर्मचारी नसल्याने अनेक उद्यानांमध्ये वेळीअवेळी मद्यपींचा वावर वाढलेला दिसतो. सकाळी उद्यानांमध्ये मद्याच्या बाटल्या पडलेल्या असल्याचे अनेकदा निदर्शनास आले असून, यामुळे महिला वर्गातदेखील नाराजी पसरली आहे. प्रभाग २४ मधील बडदेनगर, अशोकवन कॉलनी, सुंदरबन कॉलनी, जुने सिडको बडदेनगर, कोशिकोनगर उद्यान यांसह १२ उद्याने असून, बहुतांशी उद्यानांची अवस्था खराब झाली आहे. उपायुक्त शिवाजी आमले यांनी उद्यानांची प्रत्यक्ष पाहणी केली असून, त्यात सुधारणा करणार असल्याचे सांगितले.- कल्पना पांडे, नगरसेवक, प्रभाग २४रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्यसिडकोतील बहुतांशी मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या वाढल्या असून, या फांद्यांमुळे पथदीप झाकले गेले असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. सिडको विभागाची अशी परिस्थिती असतानादेखील महापालिका याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.कर्मचारी संख्या कमीसिडकोतील उद्यानांच्या देखभालीसाठी सध्या तीन महिला कर्मचाºयांसह अवघे २० कर्मचारी आहेत. सिडको भागात किमान पन्नास कर्मचारी गरजेचे असताना यासाठी अवघे २० कर्मचारी हे काम करीत असल्याने त्यांच्याकडून हे काम पूर्ण होत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सिडकोतील उद्यानांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:31 AM