नरेंद्र दंडगव्हाळ, सिडको : मागील भांडणाची कुरापत काढत एकमेकांवर वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्या हातात तलवारी, गावठी पिस्तुल घेऊन समोरासमोर भीडल्या. यावेळी रविवारी (दि.७) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना घडली. सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसर या घटनेने हादरून गेला. पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गावगुंडांनी हातात तलवारी तसेच पिस्तूल घेऊन परिसरात दहशत माजविली. संशयित आरोपी वैभव गजानन शिर्के, उर्फ गिल्या (२३ वर्षे, रा. कामटवाडे) हा रविवारी सकाळी दुचाकीने मित्र वेदांत गिरी गोसावी (रा. पवननगर) याच्यासोबत जात होता. मिनाताई ठाकरे शाळेजवळून छोट्या काळया उर्फ जितेंद्र अशोक चौधरी हा त्याच्या दुचाकीवर येत होता. त्यावेळी दुचाकीला कट लागल्याने त्याने शिर्के यास शिवीगाळ केली. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी छोटया काळया याने ‘तुला मी नंतर बघुन घेईल’ अशा शब्दांत धमकावले. यानंतर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शिर्के हा दुचाकीने त्याचा मित्र वेदांत गिरी उर्फ दादु हे घरून जुना अंबड लिंक रोड येथे गेले असता तेथे संशयित आरोपी दर्शन उत्तम दोंदे,( २९ ,रा. कामटवाडे), गणेश दत्तात्रय खांदवे (२८,रा. ज्ञानेश्वर नगर), राकेश कडु गरूड (३२,रा.इंदिरा नगर) तसेच खग्या उर्फ अथर्व दिलीप राजधर(२०,रा. पाथर्डीफाटा), बट उर्फ अजय रमेश राउत (२७,रा.वासवानी रोड), जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोटया काळया (३६,रा. बंदावणेनगर) या सर्वांनी शिर्के यास घेराव घातला. अजय राउत याने शिर्के याच्यावर कोयता उगारत धमकावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिर्के व त्याचा मित्र दादु गाडीवरून खाली पडले. या दोन्ही टोळ्या आपआपसांत भीडल्या. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आठ ते दहा जणांचे टोळके भरवस्तीत रस्त्यावर धींगाणा घालत असतानासुद्धा गस्तीवरील पोलिस पथकाला त्याची माहिती मिळत नाही हे विशेष!
नेम चुकला अन्यथा अनर्थ झाला असता..
गुंडांकडून हाणामारी सुरू असताना संशयित आरोपी दर्शन दोंदे याने त्याच्या कमरेला असलेली गावठी पिस्तुल काढुन शिर्केच्या दिशेने गोळी झाडली. त्याचा नेम चुकल्याने गोळी शिर्केला लागली नाही, अन्यथा पुन्हा एक खूनाची घटना सिडकोत घडली असती, असे नागरिकांनी सांगितले. त्याचवेळी गणेश खांदवे यानेदेखील त्याचेकडे असलेले पिस्तुल काढुन शिर्केच्या दिशेने फायरिंग करण्याचा प्रयत्न केला; मात्र पिस्तुलमधुन काडतुसे तेथेच जमीनीवर पडले त्यामुळे शिर्के तेथेही थोडक्यात बचावला.