सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने येत्या मार्च महिन्यात थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले .
गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीत कमालीची घट झाल्याने यंदाच्या वर्षी ही भर काढण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयास घरपट्टीची मार्च अखेर पर्यंत सुमारे ५६ कोटी रु. ची वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिल्याने महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी धडक वसुली मोहीम सुरू केली आहे .
यंदाच्या वर्षी महापालिकेने सुमारे ५५ टक्के वसुली केली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकबाकी आहे. मागील वर्षाची मिळून सुमारे ५६ कोटी इतकी वसुली करावयाची असून यापैकी केवळ सुमारे १८ कोटी इतकीच घरपट्टी वसूल झालेली आहे .अजूनही सुमारे ३८ कोटी इतकी थकबाकी वसूल होणे बाकी आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. यापुढील काळात थकबाकी असणाऱ्यावर मालमत्ता जप्ती तसेच पाणी बिल भरणाऱ्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.