नरेंद्र दंडगव्हाळ : सिडकोकामगार वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको भागात गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत महापालिकेतील स्थायी समिती सभापती पदाव्यतिरिक्त महत्त्वाचे व प्रतिष्ठेचे पद असलेले महापौर व उपमहापौरपद अद्यापही मिळाले नसल्याने सिडको भागातील मोठे विकासाचे प्रकल्प दुर्लक्षितच राहिले आहे. विशेष म्हणजे मनपाच्या माध्यमातून सर्वाधिक कर वसूल केला जात असतानाही सिडकोचा विकास खुंटलेला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको विभागात गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत बहुतांशी शिवसेना-भाजपा युतीचीच सत्ता होती. परंतु मागील पंचवार्षिक निवडणुकीत सेना व भाजपा स्वबळावर निवडणूक लढले होते. यात भाजपाचा सिडको भागातून एकही नगरसेवक झालेला नाही, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे सिडकोत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. परंतु गेल्या काही महिन्यांत मनसेला सोठचिठ्ठी देत नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेल्याने मनसे पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर भाजपाकडे केंद्र व राज्यातही सत्ता असल्याने व सिडको भागात भाजपाचेच दोन आमदार असल्याने त्यांची ताकद वाढली असून, भाजपाला यंदाच्या मनपा निवडणुकीत फायदा कसा घेता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापालिकेस सिडको भागातून कर रूपाने सहाही विभागांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असला तरी त्या प्रमाणात सिडकोचा विकास झालेला दिसत नाही. सिडको भागातून याआधी नाना महाले, डॉ. सुभाष देवरे, मामा ठाकरे, अमोल जाधव या पाठोपाठच विद्यमान नगरसेवक शिवाजी चुंभळे यांनी स्थायी समिती सभापतिपद भूषविले आहे. मनपा विरोधीपक्ष नेता म्हणून विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी तर सभागृह नेता माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, दिलीप दातीर यांनी पदे भूषविली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या महापौरपदासाठी सिडको भागातून नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी प्रयत्न केला होता, परंतु अचानक मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी अशी युती झाल्याने बडगुजर यांचा पराभव झाला. सिडको भागात महापौर व उपहापौर अशी महत्त्वाची पदे अद्यापही मिळाली नसल्याने सिडको भागाचा विकास खऱ्या अर्थाने खुंटला आहे.
महापौरपदापासून सिडको अद्यापही वंचित
By admin | Published: January 18, 2017 11:38 PM