सिडको : महापालिकेच्या वतीने शहरातील काही भागांतील रस्त्यालगतचे अनधिकृत बांधलेली पक्की बांधकामे, टपऱ्या व पत्र्याचे शेड काढले. यानंतर मनपाने स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केल्यानंतर आज सिडकोतील उपेंद्रनगर, उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक यांसह परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वत:हून त्यांचे पत्र्याचे शेड व बांधकाम हटविल्याने मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा धसका घेतल्याचे चित्र बघावयास मिळाले.मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नवीन वर्षात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार वर्षाच्या प्रारंभीच मनपाने पोलीस बंदोबस्तात गंगापूररोड, पेठरोड यांसह शहरातील अनधिकृत पक्के बांधकाम व पत्र्याचे शेड काढले. यात अनेक बड्या व्यक्तींचेही अतिक्रमण काढण्यात आल्याने सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी या मोहिमेचा धसका घेतला. दोन दिवसांपूर्वी इंदिरानगर, साईनाथनगर भागातील मुख्य रस्त्यावर मनपाने लाल मार्किंग करून अतिक्रमणाबाबतची अधिसूचनाच एकप्रकारे व्यापाऱ्यांना व दुकानदारांनी दिली होती. यापाठोपाठ ज्या व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी अनधिकृत पक्के बांधकाम तसेच पत्र्याचे शेड उभारलेले आहेत, अशांनी स्वत:हून त्यांचे अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहनही मनपाने केले. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा सिडकोतील दुकानदारांनी धसका घेतला. आज सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, उपेंद्रनगर भागातील दुकानदारांनी दुकानासमोरील पत्र्याचे शेड व पक्के बांधकाम, टपऱ्या हटविल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
सिडकोत अतिक्रमण मोहिमेचा धसका
By admin | Published: January 12, 2015 12:55 AM