नाशिक : येथील उत्तमनगर, शिवपुरी चौक परिसरातील अल्पवयीन टवाळखोरांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत़ या टवाळखोरांची पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़ दरम्यान, काही वर्षांपूर्वी पोलिसांनी अशाच एका टोळीवर कारवाई केली होती, त्याच प्रकारे या टोळीवर कारवाई न केल्यास नवीन गुन्हेगारी टोळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
गत काही महिन्यांपासून सिडकोतील शिवपुरी चौक तसेच डॉ. बोरसे विद्यालयाबाहेरील परिसर अल्पवयीन टवाळखोरांचा अड्डा बनले आहे़ या ठिकाणाहून जाणाऱ्या महिला वा मुलींची छेड काढणे, घरात घुसून घरातील व्यक्तींसमोर मुलींना अश्लील बोलणे, मोबाइल चोरी, शस्त्राचा धाक दाखवून लुटणे असे प्रकार अल्पवयीन गुन्हेगार करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत़ याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली व सोडून दिल्याने या गुन्हेगारांनी नागरिकांना त्रास देणे सुरूच ठेवले आहे़
विशेष म्हणजे या टवाळखोर अल्पवयीन गुन्हेगारांच्या साथीदारांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने परिसरातील गुन्हेगारी वाढली आहे़ त्या सोबत आणखी तीन ते चार मुले वाढल्याचे नागरिक सांगतात़ या अल्पवयीन टोळीस वेळीच न रोखल्यास भविष्यात नागरिक व पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे़ पोलिसांनी या मुलास समजावून सांगितले, परंतु त्याचा काहीच परिणाम न झालेला नाही़ शुक्रवारी रात्री या टोळीतील एकास मोबाइल चोरीप्रकरणी नागरिकांनी पकडून ठेवल्यााचे वृत्त आहे. दरम्यान, या टवाळखोरामुळे महिला व मुलीमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वेळीच कारवाईची मागणी केली जाते आहे़