पालकमंत्री छगन भुजबळ तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुंबईतून दुरदृष्य प्रणाली संदर्भात बैठक घेतली. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याबरोबरच मंत्रालयातील पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. नाशिकच्या वाढत्या शहरीकरणाबराेबरच येवला तालुक्यातील समस्यांबाबतदेखील यावेळी चर्चा करण्यात आली.
नाशिक शहरात पांझरापोळची सुमारे बाराशे ते तेराशे एकर जागा असून, ती नाशिक पंचवटी ट्रस्ट या संस्थेच्या ताब्यात आहे. शासनाने ही जमीन संबंधीत संस्थेला देताना काही अटी व शर्ती घालून दिल्या होत्या. सद्यस्थितीत शहराच्या वाढत्या विस्तारीकरणाला अनुसरून आगामी नियोजनासाठी जिल्हाधिकारी तसेच सिडको प्रशासन यांनी कायदेशीर बाबी तपासाव्यात, तसेच सिडकोच्या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागांनी या कामाला प्राधान्य द्यावे, अशी सूचना भुजबळ यांनी केली.
यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडको प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबंधित ट्रस्ट आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीस नगरविकासचे प्रधान सचिव महेश पाठक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
इन्फो...
येवल्याच्या विकास कामांवर चर्चा
नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या विकास कामांवर यावेळी चर्चा झाली. विशेषत: भुयारी गटार योजनेचा ६३ कोटी रुपयांचा शासन दरबारी असलेला प्रस्ताव मंजूर करावा, असे नगरविकास विभागाला साकडे घालण्यात आले.