सिडको : कामटवाडेजवळील बंदावणेनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून घरासमोरील वाहनतळातवर असलेल्या चार दुचाकी जाळणाऱ्या संशयितांना अंबड पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले.सिडकोतील बंदावणेनगर येथील अभिनय रो-हाऊसेसमध्ये रमेश दळवी कुटुंब राहते. गुरुवारी (दि. ३१) रात्री जेवण करून दळवी कुटुंबीय झोपलेले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास रस्त्यावरील गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने रमेश दळवी यांची पत्नी शोभा यांना जाग आली, तेव्हा त्यांच्या घरात संपूर्ण धूर झाल्याचे दिसले. त्यांनी लगेचच त्यांचे पती रमेश दळवी यांना उठविले. त्यांना आपल्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकींना कोणीतरी ज्वलनशील पदार्थाच्या साहाय्याने आग लावल्याचे समजले. दळवी व त्यांच्या कुटुंबीयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु या आगीत पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी क्र. एम.एच. ई.एम. ६३३३, स्कुटी क्र. एम.एच. डी.आर. ६८६४, एम.एच.१५ ए.ई.५७११ यांसह चार दुचाकी जळून खाक झाल्या. तसेच या जाळपोळीत दळवी यांच्या घरातील सोफासेटसह घरातही आगीच्या झळा पोहोचल्याने नुकसान झाले. या घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळविताच या ठिकाणी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी भेट देत पाहणी केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काही तासातच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, अनिल दिघोळे, डंबाळे व कर्मचाऱ्यांनी जाळपोळ करणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेतले. पोेलिसांनी या जाळपोळीच्या घटनेनंतर काही तासातच यातील संशयित फरहान शेख, राहुल गोतिसे, योगेश पाटील यांसह चौघांना ताब्यात घेतले. (वार्ताहर)
सिडकोत दुचाकींची जाळपोळ
By admin | Published: January 01, 2016 10:59 PM