सिडको : त्रिमूर्ती चौकयेथील राजीव गांधी भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी व्यवसायासाठी नवीन जागा मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी मनपा सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजी व्यावसायिकांनी प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांना निवेदन दिले.त्रिमूर्ती चौक येथील पेठे विद्यालय परिसरात रस्त्यालगत भाजी विक्रेते व्यवसाय करीत होते. त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे कारण देत मनपाने यानंतर त्रिमूर्ती चौक येथे हॉकर्स झोन जाहीर केला. या मोकळ्या जागेवर मनपाने राजीव गांधी भाजीमार्केट अंतर्गत भाजीविक्रेत्यांना जागा दिली; परंतु सदर जागेवर सुविधा नसल्याने विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे, तसेच भाजीविक्रेत्यांना देण्यात आलेली जागा लहान आहे. राजीव गांधी भाजीमार्केटमधील विक्रेत्यांना नवीन जागा तसेच गाळ्यासाठी जागा वाढवून मिळावी, या मागणीसाठी भाजीविके्रत्यांनी मनपा सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन मनपा सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी माजी विरोधी पक्षनेता नगरसेवक सुधाकर बडगुजर, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता निमसे, उपअभियंता नरसिंगे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मार्केटशेजारी मैदान असल्याने क्रिकेटमधील चेंडू मार्केटमध्ये येतो. दारूचे दुकान शेजारी असल्याने दारू पिऊन येणाऱ्यांच्या त्रास होतो. कमी जागा असल्याने ग्राहक येत नाही. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे मार्केटसाठी नवीन जागा मिळावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. यावेळी गुलाब महाजन, प्रदीप पाटील, प्रशांत सूर्यवंशी, किरण करडे, मीना भागवत, ललीता परदेशी, दशरथ चव्हाण आदींसह शेकडो विक्रेते उपस्थित होते.
सिडकोत भाजीविक्रेत्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:45 AM