सिडको : येथील टिप्पर गँगशी संबंधित तसेच सद्यस्थितीत तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराचा शनिवारी (दि़१८) मध्यरात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून खून केल्याची घटना उपेंद्रनगरमध्ये घडली़ अजिंक्य संजय चव्हाण (२५, रा़ माणिकनगर, सिडको) असे मयत युवकाचे नाव आहे़ पूर्ववैमनस्यावरून त्याच्याच मित्रांनी हा खून केल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अजिंक्य चव्हाण यास शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सिडकोतील उपेंद्रनगरच्या गणपती मंदिराजवळील मैदानात अज्ञात मारेकऱ्यांनी बोलावले़ यानंतर त्यास जबर मारहाण करून संशयितांनी रिव्हॉल्व्हरने डोक्यात व पोटावर गोळी झाडली़ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजिंक्यला सोडून मारेकरी घटनास्थळाहून फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी अमोल जाधव, गोरख वराडे, रवींद्र रणमाळे (तिघेही रा़ सिन्नर) व प्रदीप जायभाये (रा़आडगाव) या चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)
सिडकोत युवकाची गोळ्या घालून हत्त्या
By admin | Published: June 19, 2016 11:15 PM