पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीरला लिलावात प्रती जुडीला १०० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.
बाजार समितीत विक्रीला येणाऱ्या कोथिंबीर मालाची आवक काही प्रमाणात कमी झाल्याने त्यातच ग्राहकांकडून मागणी असल्याने बाजारभाव तेजीत असल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले. कोथिंबीरपाठोपाठ कांदापात ४२ रुपये, मेथी ३० रुपये, तर शेपू २५ रुपये प्रती जुडी दराने विक्री झाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. पावसाळा सुरू असल्याने अनेक भागातील कोथिंबीर माल भिजला गेल्याने आवक कमी झाली आहे. गेल्या आठवड्यापासून कोथिंबीर बाजारभाव टिकून असून, शनिवारी प्रती जुडी १०० रुपये बाजारभाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.