नाशिक : वीस लाखांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघा कामगारांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोकड लुटण्याची घटना सिटीसेंटर मॉलसमोरील वृंदावन इमारतीसमोर घडली. भरदुपारी वर्दळीच्या ठिकाणी सिनेस्टाइल पद्धतीने लुटारुंनी दुचाकीसमोर दुचाकी आडवी घालून रोकड घेऊन पलायन केले. याप्रकरी कंपनीचा कर्मचारी अक्षय बागुल याने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक-पुणेरोडवरील बोधलेनगर येथे ब्रिंक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावानी कॅश प्रोव्हायडर कंपनी आहे. या कंपनीने मार्केटमध्ये वितरीत केलेल्या रकमेपोटी रोज काही रक्कम वसूल केली जाते. सदर कंपनीचे दोन कर्मचारी नेहमीप्रमाणे बाजारातून रक्कम वसूल करून सिटीसेंटर मॉल रस्त्याने कंपनीकडे जात होते. त्यांच्याकडे सुमारे वीस लाख ४५ हजार रुपयांची रोकड होती. या मार्गावरील वृंदावन इमारतीसमोर त्यांची दुचाकी येताच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी दुचाकी अडविली आणि त्यांतील एकाने रिव्हाल्व्हरचा धाक दाखवून पैशांची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी या कर्मचाºयांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता लुटारूने रिव्हॉल्व्हरच्या मागच्या बाजूने एका कर्मचाºयाच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला. काही कळण्याच्या आतच दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कर्मचाºयांच्या हातातून बॅग हिसकावून तेथून पळ काढला. भरदुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांपुढे चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असून, तपासाला गतीदेखील देण्यात आली आहे. दरम्यान, फिर्यादीने संशयितांचे सर्व वर्णन पोलिसांना दिले असून, चोरटे हे स्थानिक आणि माहितगार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी पाळत ठेवून ही नियोजनबद्ध लूट केल्याचाही पोलिसांना दाट संशय आहे. संबंधित कंपनी आणि कंपनीच्या व्यवहाराबद्दल माहिती असलेल्यांनीच सदर कृत्य केले असावे असाच गुन्ह्याचा घटनाक्रम असल्याने पोलिसांनी त्यादिशेने तपासाला सुरुवात केली आहे.पाठलाग आणि नियोजित कट ?सातपूर औद्योगिक वसाहतीतून रक्कम वसूल करून सिटीसेंटर मॉलमार्गे कंपनीचे कर्मचारी कंपनीकडे निघाले होते. चोरट्यांनी कामगारांंना एकांतात न गाठता थोड्याशा वर्दळीच्या ठिकाणी गाठून लाखोंची लूट केली. चोरट्यांनी संपूर्ण अभ्यासकरून या घटनेला मूर्त स्वरूप दिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. संबंधित कर्मचारी रोज किती रक्कम घेऊन किती वाजता जातात याची माहिती तर मिळविण्यात आली होतीच परंतु रक्कम किती मोठी आहे याचा अंदाज घेतच चोरट्यांनी लूटमार केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सिनेस्टाइल २० लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:15 AM