सिडको : सिडकोत पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केल्यानंतर महापालिकेमार्फत वाढीव बांधकामांचे रेखांकन (डिमार्केशन) करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या रेखांकनाला जागोजागी नागरिकांकडून विरोध होऊ लागला आहे. मंगळवारी (दि.२२) रायगड चौकात वाढीव बांधकामांचे मार्किंग सुरू करण्यात आले असता नागरिकांनी अधिकारी व कर्मचारी यांना घेराव घालून विरोध दर्शविला. सिडकोच्या पहिल्या योजनेपासून मार्किंग सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन विभागीय अधिकायांना यावेळी देण्यात आले. दरम्यान, बांधकामे हटविल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा नागरिक व महिलांनी दिला. सिडकोतील वाढीव बांधकामांना मार्किंग करण्यासाठी महापालिकेच्या सिडको विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी मंगळवारी दुपारी तानाजी चौकात गेले. तानाजी चौकात सुमारे दोनशे वाढीव बांधकामांना लाल रंगाने रेखांकन करण्यात आले. मात्र, या रेखांकनास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर मनपा अधिकारी व कर्मचारी रायगड चौकात पोहोचले.या चौकातही वाढीव बांधकामांना लाल रंगाने रेखांकन करण्यास सुरु वात असता परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी मनपा विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना नागरिकांनी घेराव घातला. सदर मार्किंग काम बंद करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जमलेल्या महिला, नागरिकांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर नागरिकांनी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना निवेदन दिले. मनपाने सिडको योजना क्र मांक एकपासून अतिक्र मण काढावे व योजना एकपासून डिमार्केशन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, सोमवारी शिवपुरी चौकात मोहीम राबविण्यात आली असता, तेथेही नागरिकांनी मार्किंग करण्यास कडाडून विरोध दर्शविला होता. मनपाकडे सुरुवातीस प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार अनधिकृत बांधकामांचे मार्किंग करण्यात येत असून, सिडको व परीसरातील सर्वच ठिकाणांच्या गटारीवरील बांधकामे तसेच रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणे ही पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणार असून, पावसाळ्यानंतर उर्वरित अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
विभागीय अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:09 AM