पंचवटी : येत्या चार दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात शांतता कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पंचवटी पोलिसांच्या वतीने दोन तास पायी सशस्र संचलन करण्यात आले.निवडणुकीच्या दिवशी नागरिकांनी मतदानासाठी कोणताही संकोच मनात न बाळगता तसेच कोणालाही न घाबरता अगदी बिनधास्तपणे घराबाहेर पडावे. याशिवाय गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा तसेच मतदानाच्या दिवशी पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे यासाठी सकाळी संचलन करण्यात आले. सोमवारी सायंकाळी पाच वाजता पंचवटी पोलीस ठाणे येथून सशस्र संचलनाला सुरुवात करण्यात आली. दिंडोरीरोड, फुलेनगर, पंचवटी कारंजा, काट्या मारु ती चौक पोलीस चौकी आदींसह अन्य परिसरात सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करण्यात आलेल्या पायी सशस्र संचलनात पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त अनिरुद्ध आढाव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांच्यासह ७५ हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.सातपूरला संचलनसातपूर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जवळ येऊन ठेपल्याने मतदान शांततेत पार पडावे आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सातपूर परिसरात पोलीस दलातर्फे सशस्र संचलन करण्यात आले.मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करीत सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली सशस्र संचलन करण्यात आले. सातपूर पोलीस ठाण्यापासून संचलनास प्रारंभ करण्यात आला. स्वारबाबानगर, शनिमंदिर, श्री छत्रपती शिवाजी मार्केट आदी परिसरातून संचलन करण्यात आले. या संचलनात ८ पोलीस अधिकारी, शीघ्र कृती दलाचे जवान, गुजरात राज्यातील ६५ पोलीस, सातपूर पोलीस ठाण्याचे ५५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
पंचवटीत पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:56 PM