नाशिक : कोरेाना या विषाणू विरोधात लढणारी प्रतिपिंड (अँटिबॉडीज) किती जणांच्या शरीरात तयारी झाली आहेत, म्हणजेच हर्ड इम्युनिटी (सामूहिक प्रतिकारशक्ती) किती प्रमाणात तयार आहेत. त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तब्बल चाळीस पथके तयार करण्यात आली आहेत. आता येत्या दोन दिवसांत सिरो सर्वेक्षणास सुरुवात होणार असून, वेगवेगळ्या भागातील अडीच हजार नागरिकांचे नमुने घेतले जाणार आहे.
नाशिक शहरात केारोनाचा पहिला रुग्ण ६ एप्रिल रोजी आढळल्यानंतर जूनपर्यंत संख्या मर्यादित होती. मात्र, नंतर संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. अगदी एकेका दिवशी एक हजार ते बाराशे रुग्ण आढळले, तसेच दहा ते बारा जणांचा मृत्यूही हेात होता. ऑक्टोबर महिन्यानंतर हे प्रमाण कमी होत गेले, तरी दिवाळीनंतर केारोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत होती. विशेषत: दिवाळीत ज्या प्रमाणात बाजारपेठा गजबजल्या, त्यातून आरोग्य नियमांचे पालन हेात नसल्याने केारोनाचा धोका आणखीच वाढला. दरम्यान, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत नाशिकमध्ये सिरो टेस्ट करण्याच्या सूचना केल्या हेात्या. त्यानुसार, महापालिकेने तयारी केली आहे. औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने नियोजन करून, तशा प्रकारे सर्वेक्षणाचे नियोजन केले आहे. एकूण लोकसंख्या, कोरोनाबाधितांची संख्या आणि अन्य तपशिलाच्या आधारे सँपल सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने गेल्याच आठवड्यात प्रशिक्षणही घेतले आहे. आता येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष सर्वेक्षणास सुरुवात होईल, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.
इन्फो..
सिरो सर्वेक्षणासाठी महापालिकेने एकूण ४० पथके तयारी केली आहेत. यात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा सहायक, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक भागातील दर दहाव्या घरात अठरा वर्षांपुढील व्यक्तींचे नमुने घेतले जातील. अशा व्यक्तींकडून अगोदरच संमतीपत्र घेतले जाईल. मोबाइल ॲपवर या संदर्भातील अर्ज भरून नोंदही ठेवण्यात येणार आहे. एकूण अडीच हजार नागरिकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.
इन्फो..
नाशिक जिल्ह्याात यापूर्वी मालेगाव महापालिकेने सात हजार जणांची सिरो तपासणी केली होती, अशा प्रकारच्या चाचणीमुळे नकळतपणे विषाणूचा संसर्ग होऊन काही रुग्ण बरे झाल्याचाही अंदाज येतो. त्यातूनच हर्ड इम्युनिटी म्हणजेच सामूहिक प्रतिकारशक्तीचाही अंदाज येऊ शकतो.