नाशिक- शहरात आफ्रिकेतून आलेल्या एका नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे या नागरिकाची ओमायक्रॉन चाचणी करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहेत.
नाशिक मधील एका मोठ्या कंपनीत कामासाठी 3 विदेशी नागरिक दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात दाखल झाले या तिघांनी कंपनीत जाण्यासाठी कोरोना चाचणी केली. त्यात एक जण पॉझिटिव्ह आला आहे त्याचे जिनोम सिक्वेन्ससाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याला ओमायक्रोन आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.
या रुग्णाला नाशिक महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात विशेष विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याच्या बरोबर आलेले अन्य दोघे नागरिक कोरोना बाधित नसले तरी त्यांनाही ते सध्या राहत असलेल्या हॉटेलमध्ये विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. बधिताच्या संपर्कात आलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांचीही महापालिका चाचणी करणार आहे.