नाशिक : जिल्ह्यातील सर्व वीज वितरण कंपनीची कार्यालये व सेवा केंद्रांमध्ये लवकरच ‘लोकपाल’ कायद्यानुसार वीज नियामक आयोगाने पारीत केलेले ‘सिटीझन चार्टर’चे फलक लावले जातील, असे आश्वासन वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता के. व्ही़ अजनाळकर यांनी वीज नियामक आयोगाच्या प्रतिनिधींना दिले आहेत़वीजग्राहकांच्या विविध प्रश्नांसंबंधी १६ जानेवारीला मुख्य अभियंता व जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंत्यांसोबत वीज नियामक आयोगाच्या सदस्यांनी चर्चा केली़ विधी सल्लागार सिद्धार्थ वर्मा यांनी लोकपाल कायद्यानुसार सिटीझन चार्टरचे अर्थात ‘सेवेचे निश्चितीकरण व भरपाईचे निश्चितीकरण’ या माहितीचे पाच बाय पाचचे फलक प्रत्येक कार्यालय, कक्ष कार्यालय, पैसे भरणा केंद्र, तक्रार केंद्रामध्ये ३१ जानेवारीपर्यंत लावण्याची मागणी केली़ यावर अजनाळकर यांनी लवकरच या माहितीचे फलक लावण्यात येतील, असे आश्वासन दिले़वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीजबिल थकबाकी असलेल्या ग्राहकांना कोणतीही लेखी नोटीस न देता वीजपुरवठा बंद करतात़ वास्तविक ग्राहकाचे आगाऊ डिपॉझिट जमा असूनही त्यापेक्षा कमी थकबाकीकरिता वीजग्राहकांचे कनेक्शन बंद करणे बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यानंतर यापुढे ग्राहकांना वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी लेखी नोटीस देण्याचे आश्वासनही अजनाळकर यांनी दिले़यावेळी वीज नियामक आयोगाच्या प्रतिनिधी विलास देवळे, अॅड़ व्यवहारे, बबन चौरे यांनी ग्राहकहिताच्या दृष्टीने विविध मागण्या तसेच ग्राहक सेवा सुधारणांची बैठक घेण्याची मागणी केली असता दर तीन महिन्यांनी ही बैठक घेतली जाईल, असे अजनाळकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील वीज केंद्रांवर लवकरच ‘सिटीझन चार्टर’
By admin | Published: January 23, 2015 11:13 PM