नाशिक : भविष्यातील नाशिकचे दर्शन थेट टुडी आणि थ्रीडी व्हर्च्युअल सेंटरच्या माध्यमातून नाशिककरांना अनुभवता यावे, या उद्देशाने २०१९मध्ये अनोख्या ‘सिटीझन एक्सपिरीयन्स सेंटर’ची उभारणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात अडीच वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही असा कोणताच ‘एक्सपिरीयन्स’ नाशिककरांना अनुभवता आला नाही. किंबहुना या कामाचा जणू विसरच स्मार्ट सिटी कंपनीला पडल्याचे दिसून येत आहे.
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीतर्फे सुरक्षित शहर उपक्रमांतर्गत महात्मा फुले कला दालनाच्या पहिल्या मजल्यावर सिटीझन एक्सपिरीयन्स सेंटर उभारण्यात येणार होते. या उपक्रमांतर्गत अनोखी अनुभूती नाशिककरांना देण्याचा प्रयास करण्याचे सूतोवाच दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. हे सिटीझन एक्सपिरीयन्स सेंटर सुरू करण्यासंदर्भात स्मार्ट सिटीची टीम तसेच संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांनी महात्मा फुले कला दालनात पाहणी केली. या प्रकल्पातून नागरिकांना व पर्यटकांना व्हर्च्युअल रिॲलिटीचा अनुभव घेता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. या ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती, विविध प्रकल्पांचे मॉडेल्स, विविध प्रकारचे व्हिडिओ, इनोव्हेशन हब, स्टार्ट अप याची माहिती प्रदर्शित करण्याचेही निश्चित करण्यात आले होते. सिटीझन एक्सपिरीयन्स सेंटरमध्ये नागरिकांना स्मार्ट सिटीअंतर्गत पूर्ण झालेले, सुरू असलेले आणि सुरू होणाऱ्या प्रकल्पांची माहिती देण्यात येणार होती. तसेच एकाच छताखाली नाशिकची ऐतिहासिक, आध्यात्मिक, औद्योगिक आणि भविष्यातील स्मार्ट शहराची माहिती टुडी, थ्रीडी स्वरूपात पाहता येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती, छायाचित्रे आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून तसेच म्युरलद्वारेही स्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती येथे देण्यात येणार आहे. दोन तृतीयांश हॉलचा वापर या उपक्रमासाठी करण्याचेही निश्चित करण्यात आले होते.
इन्फो
स्मार्ट अनुभूतीची केवळ घोषणा
मंत्रभूमी ते यंत्रभूमी हा नाशिक शहराचा प्रवास येथे लघुपटाच्या माध्यमातून उभा करण्यासाठी एक डार्क रूम म्हणजेच व्हर्च्युअल रिॲलिटी एक्सपिरीयन्स रूमही त्यात ठेवण्यात येणार होती. त्यात ३६० अंशांत बनविण्यात आलेल्या व्हिडिओंचा आणि माहितीपटांचा अनुभव घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याशिवाय स्मार्ट डिव्हायसेस म्हणजे फ्लड सेन्सर, एन्व्हायर्मेंट सेंसर, सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय डिव्हायसेस, पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीम, इमर्जन्सी कॉल बॉक्ससह इतर स्मार्ट डिव्हायसेसचे मॉडेल्स अनुभवण्याची अनोखी संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार हाेती. मात्र, हे सारे काही कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे.