पाथर्डी फाटा : पाथर्डी गावाबरोबरच पाथर्डी फाटा भागातील वासननगर, प्रशांतनगर, समर्थनगर भागात भटक्या श्वानांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, या श्वानांनी अनेकांच्या पाळीव कोंबड्या फस्त केल्या, तर काही शेळ्यांनाही चावा घेऊन जखमी केले आहे. पाथर्डी गावातील आंबेडकरनगर, सुखदेवनगर भागातील नागरिक या प्रकाराने चांगलेच धास्तावले असून, भटक्या श्वानांचा महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाथर्डी, दाढेगाव, पाथर्डी फाटा येथील वासननगर, प्रशांतनगर, ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर आदि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. या परिसरातील प्रत्येक रस्त्यावर भटक्या श्वानांच्या झुंडीच्या झुंडी भटकताना आढळतात. श्वानांमुळे लहान मुलं, महिला, पादचारी यांना रस्त्याने चालणे, कामानिमित्त घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. पाथर्डी गावातील आंबेडकरनगर, सुखदेवनगर, राजवाडा भागात श्वानांचा प्रचंड उपद्रव असल्याचे भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्ष शारदा दोंदे यांनी सांगितले. या श्वानांनी शारदा दोंदे, बेबीबाई दोंदे, शांताबाई उन्हवणे व कमलाबाई पवार यांच्या पाळीव कोंबड्यांवर हल्ला चढवल्याने त्या मृत्युमुखी पडल्या. काही शेळ्यांनाही चावा घेऊन जखमी केल्याचे सांगण्यात आले. निर्बीजीकरणासाठी शहरभरातून आणलेले श्वान या भागात सोडून दिले जात असल्यानेच त्या परिसरात नेहमीच भटक्या श्वानांचा प्रचंड उपद्रव असतो, या आरोपाचा नागरिक वारंवार पुनरुच्चार करतात. (वार्ताहर)
लवकरच कार्यवाही करणारपावसाळ्यात श्वान बसण्याच्या, आराम करण्याच्या जागा ओल्या झाल्याने त्यांचा रस्त्यावरचा वावर अधिकच वाढला आहे. सध्या त्यांचा प्रजननाचा हंगाम असल्याने श्वानांची आक्र मक वृत्ती वाढलेली असते. त्यातून शेळ्या व कोंबड्यांवर हल्ला झाला असावा. उपरोक्त भागातील श्वान पकडण्याची मोहीम सुरू करून नागरिकांमधील भीती कमी केले जाईल.- डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा